संतप्त शेतकऱ्यांचे काजू – बदामाचे निवेदन – किसान सभेचे राज्यभर आंदोलन

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांत शेतकरी प्रश्नांवर जोरदार आंदोलने करण्यात आली. तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानभरपाईसह तातडीने मदत जाहीर करावी, नियमित कर्जदारांना किमान दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावे, अटी-शर्तींमुळे वंचित राहिलेल्या सर्व कर्जदारांना कर्जमाफी द्यावी, पीक विम्याचे सर्व ट्रिगर पुन्हा लागू करावेत तसेच जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क द्यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

किसान सभेने यापूर्वी या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला होता. तसेच १० ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती.

महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नियमित कर्जदारांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच वंचित कर्जदारांना कर्जमाफी, देवस्थान, इनाम, वर्कस, गायरान व वन जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्याची कार्यवाही आणि पीक विम्याचे काढून टाकलेले ट्रिगर लागू करण्यासाठी तातडीने प्रक्रिया करण्यासंदर्भात मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.

मात्र, या चर्चेला महिना उलटूनही मान्य मागण्यांची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना दुष्काळ आढावा बैठकीत मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत किसान सभेने संताप व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर राज्यभर झालेल्या आंदोलनात सरकारच्या मंत्र्यांना निवेदनासोबत काजू-बदाम पाठवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध करण्यात आला. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाची अधिक परीक्षा न पाहता मान्य केलेल्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी मदत जाहीर करावी, अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किसान सभेने दिला.

अहिल्यानगर, ठाणे, पालघर, बुलढाणा, गडचिरोली, सांगली, पुणे, रायगड, बीड, नांदेड यांसह २१ जिल्ह्यांत हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, किरण गहला, अर्जुन आडे, शंकर शिडाम, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, अजय बुरांडे, अनिल गायकवाड, उद्धव पौळ, दीपक लिपणे, रामेश्वर पौळ आदी कार्यकर्त्यांनी केले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!