महाआक्रोश मोर्चादरम्यान प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात धुडगूस ; गुन्हा दाखल
संगमनेर : प्रतिनिधी
अनियमित वीजपुरवठा, सक्तीचे भारनियमन, निळवंडे-भंडारदरा धरणातील पाण्याचा प्रश्न आणि दुष्काळी परिस्थिती आदी विविध मागण्यांसाठी संगमनेरात शेतकऱ्यांचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान प्रांताधिकारी कार्यालयाच्या दालनात बळजबरीने प्रवेश करून गोंधळ घातल्याप्रकरणी विक्रम आत्माराम खांडरे (रा. कवठे कमळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान काही आंदोलक आक्रमक झाले. यावेळी खांडरे याने प्रांताधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ओलांडून कार्यालयात प्रवेश केल्याचा प्रकार घडला.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, खांडरे याने प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात बळजबरीने प्रवेश करून तेथील खुर्च्या व कागदपत्रांची फेकाफेक केली. तसेच शासकीय कार्यालयातील महत्त्वाचे साहित्य व कागदपत्रांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय कार्यालयाची नासधूस करणे तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी आरोपांखाली खांडरे याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
