खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कल्याण रेल्वे स्टेशनवर पकडला ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क :
पिंपळगाव कौडा येथे झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. हरीष गुलाब काळे (वय ३०, रा. पिंपळगाव कौडा, ता. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळगाव कौडा येथे हरीष गुलाब काळे याच्या घरी भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्यासाठी विक्रम रोहिदास भोसले व त्यांचा भाऊ किरण रोहिदास भोसले गेले होते. यावेळी भांडण सोडविण्याच्या कारणावरून हरीष काळे याने किरण भोसले यांच्या तोंडावर, छातीवर व पोटावर लोखंडी कत्तीने वार केल्याचा आरोप आहे. या घटनेत किरण भोसले यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३५२ व ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फुरकान शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, दीपक जाधव व अरुण मोरे यांचे पथक तयार करण्यात आले.

गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पथकाने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी श्रीगोंदा, दौंड, पुणे व मुंबई परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेतला. मात्र आरोपी सतत आपले ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत होते.
दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी हरीष काळे हा कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेऊन हरीष गुलाब काळे याला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.
