संगमनेरात वाळू तस्कर पकडले !

संगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत विनाक्रमांकाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच वाळू असा एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अभिषेक प्रभाकर गुंजाळ (वय २९, रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि गणेश अशोक बालोडे (वय ३२, रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

खांडगाव चौफुला ते वैदवाडी मार्गावर सापळा

दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी सदर पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती घेत असताना, एक इसम लाल रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून खांडगाव चौफुल्याकडून वैदवाडीकडे वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष खांडगाव रोड, वैदवाडी, ता. संगमनेर येथे सापळा रचला. यावेळी लाल रंगाचा ट्रॅक्टर येताना दिसून आल्याने पोलिसांनी तो थांबवून त्याची पाहणी केली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये वाळू आढळून आली.

यावेळी पोलिसांनी अभिषेक प्रभाकर गुंजाळ (वय २९, रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि गणेश अशोक बालोडे (वय ३२, रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता, वाळू वाहतुकीचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ६ लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच १० हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण ६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, निळकंठ कारखेले, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ व सतीश भवर या पथकाने ही कारवाई केली आहे.

या प्रकरणी वरील दोन्ही आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ८९०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) सह पर्यावरण कायदा कलम ३, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!