स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद !
३ आरोपी ताब्यात ; बनावट सोन्याचे दागिने जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
घराच्या खोदकामात सोने सापडल्याचे सांगून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन पुरुष आणि एका महिलेसह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १,६०० ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे दागिने, ११ मोबाईल आणि एक हँडबॅग असा एकूण ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी सचिन बाळासाहेब वाघ (वय ३०, रा. नवनागापूर, एमआयडीसी, अहिल्यानगर) यांना दोन-तीन दिवसांपूर्वी तीन अनोळखी इसमांनी भेटून त्यांच्या घराच्या खोदकामात सोने सापडले असून, त्यातील एक किलो सोने स्वस्तात विकायचे असल्याचे सांगितले. आरोपींनी सोन्यासारखे दिसणारे दागिने दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीने आरोपींना एक लाख रुपये आगाऊ दिले.

उर्वरित व्यवहार करण्यासाठी आरोपींनी फिर्यादीस २३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता जुने आरटीओ कार्यालय परिसरात बोलावले. मात्र, फिर्यादीस संशय आल्याने त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, संदिप पवार, शाहीद शेख, विशाल गवांदे, संतोष खैरे, रोहित मिसाळ, प्रशांत राठोड व भाग्यश्री भिटे यांचे पथक तयार केले. माहितीची खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना व मार्गदर्शन देत पथकाला रवाना करण्यात आले.
२३ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष जुने आरटीओ कार्यालय, अहिल्यानगर परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित दोन पुरुष आणि एक महिला आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे :
1. राहुल शंभु सोलंकी (वय २४), रा. रामटेक रेल्वे स्टेशन, शीतलवाडी, रामटेक, ता. जि. नागपूर.
2. नंदु मानसिंग सोलंकी (वय ३६), रा. केकेनगर, पडसोडा, रामटेक, ता. जि. नागपूर.
3. पुजा राहुल सोलंकी (वय २४), रा. रामटेक रेल्वे स्टेशन, शीतलवाडी, रामटेक, ता. जि. नागपूर.
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून १,६०० ग्रॅम वजनाच्या बनावट सोन्याच्या मण्यांच्या माळा, ११ मोबाईल फोन आणि एक हँडबॅग, असा एकूण ५२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यातील आरोपी राहुल शंभु सोलंकी याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो वरील साथीदारांसह नागरिकांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नागरिकांना बनावट सोन्याचे दागिने दिले जात असल्याचेही त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. बनावट दागिन्यांची विक्री करण्यासाठी जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनचा वापर केला जात असल्याची माहितीही चौकशीत समोर आली.
ताब्यातील आरोपींना जप्त मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
