गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट ; सहा जणांविरुद्ध गुन्हा
संगमनेर प्रतिनिधी –
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे मोठ्या आवाजात वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
24 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान कोकणगाव येथे श्री गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू होती. यावेळी आरोपींनी डीजेवर मोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी व अंमलदारांनी आवाज कमी करण्याबाबत वेळोवेळी सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे.

जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी 12 सप्टेंबर 2026 रोजी आदेश क्रमांक डीसी/कार्य/9.ब.1/2135/2026 अन्वये बीएनएसएस 2023 मधील कलम 163(1) प्रमाणे आदेश जारी केला होता. या आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी डीजे मोठ्या आवाजात वाजविल्याचा आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
1. शिवम नंदकिशोर ढगे — अध्यक्ष, शिवजा प्रतिष्ठान, कोकणगाव
2. हेमंत यशवंत धुमाळ, वय 45 वर्षे, रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा
3. रजिंद्र आबादास जाधव — अध्यक्ष, शिवछत्रपती प्रतिष्ठान, पानसरवाडी, कोकणगाव
4. अक्षय बाजीराव तांबे, वय 29 वर्षे, रा. मंचर, चांदवडी, ता. आंबेगाव, जि. पुणे
5. जनार्दन लक्ष्मण पारधी — अध्यक्ष, नाभोजी बाबा प्रतिष्ठान, कोकणगाव
6. आकाश विठ्ठल गुंजाळ, रा. खांडगाव, ता. संगमनेर
पोलीस कॉन्स्टेबल 1562 राजेंद्र धोंडीराम घोलप, नेमणूक संगमनेर तालुका पोलिस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी 25 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 3.50 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास पोहेकॉ/324 आर.एम. महाजन यांच्याकडे देण्यात आला आहे.
