चेन स्नॅचिंग करणारी टोळी पकडली !

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

सण, यात्रा व धार्मिक कार्यक्रमांमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तसेच नागरिकांच्या सोन्याच्या चेन लांबविणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले असून, तब्बल ५ लाख ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

नागपंचमीच्या दिवशी, १७ ऑगस्ट २०२६ रोजी नालेगाव येथे देवदर्शनासाठी गेलेल्या पुनम गणेश गडाख (वय ३५) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबविले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पांडुरंग सोन्याबापू मासाळकर (४६), राजेंद्र दामू माने (३७), नारायण दशरथ गायकवाड (४०) आणि हिरालाल सुखदेव जाधव (४२) या चौघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी नालेगाव येथे नागपंचमीच्या गर्दीत मंगळसूत्र चोरी केल्याची तसेच संगमनेर तालुक्यातील पारगाव येथील यात्रेदरम्यान आणि मे २०२६ मध्ये संगमनेर येथे गगनगिरी महाराज सप्ताहाच्या कार्यक्रमात सोन्याच्या चेन चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. ७१२/२०२६, संगमनेर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ४७४/२०२६ आणि संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३८१/२०२६, हे तीन गुन्हे उघडकीस आले.

आरोपी पांडुरंग मासाळकर याने चोरी केलेले सोन्याचे दागिने पाथर्डी येथील एका पडक्या खोलीत ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष तेथून ३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र (₹४२ हजार), ४.५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र (₹६३ हजार), १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (₹१ लाख ४० हजार), १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (₹२ लाख १० हजार) आणि ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (₹१ लाख १२ हजार) असा एकूण ५ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ताब्यातील आरोपींना जप्त मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!