संगमनेर मुख्याधिकाऱ्यांचे बनावट सही – शिक्के
दिल्ली नाका येथील दारू दुकान चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
संगमनेर प्रतिनिधी :
संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरामध्ये नगरपालिकेच्या जागेवर आणि मुख्याधिकाऱ्यांच्या सही-शिक्क्याचा वापर करून थेट बनावट बांधकाम प्रमाणपत्र तयार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका लेखी तक्रारीद्वारे या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला असून, संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून ते दारू दुकान निष्कासित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन देऊन आठ दिवस होत आले आहेत. मुख्याधिकारी, प्रशासन आणि सत्ताधारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली नाका येथील संगमनेर हद्दीतील सर्व्हे नं. २०९ (जुना १६६) या नगरपालिकेच्या जागेत नवले यांच्या मालकीचे ‘सागर वाईन्स’ (देशी दारू दुकान CL-3, No. 175) हे दुकान बेकायदेशीरपणे चालवले जात असल्याचा गंभीर आरोप आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार दारू दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी जागेची वैधता आणि उत्पादन शुल्क भरणे अनिवार्य असते. मात्र, संबंधित चालकाने नगरपालिकेच्या जागेवर थेट अतिक्रमण करून हे दुकान थाटले. एवढेच नव्हे तर ही जागा अधिकृत असल्याचे दर्शवण्यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या लेटरहेडचा, तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या सही आणि शिक्क्याचा गैरवापर करून चक्क बनावट प्रमाणपत्र तयार केले आणि नगरपालिका व राज्य उत्पादन शुल्क विभागाची घोर फसवणूक केली.
विशेष म्हणजे, नगरपालिकेने सदर बांधकामाबाबत कोणताही अधिकृत दाखला दिलेला नसल्याचे २२ जानेवारी २०२५ रोजीच्या पत्राद्वारे उत्पादन शुल्क विभागाला आधीच कळवले आहे. यामुळे शासकीय अधिकाऱ्यांची सही आणि शिक्का वापरून बनावट दस्तऐवज तयार केल्याचे स्पष्ट झाले असून तक्रारदारांनी याला गंभीर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा म्हटले आहे.

या अनधिकृत दारू दुकानामुळे परिसरातील शांतता पूर्णपणे धोक्यात आली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दुकानाभोवती मद्यप्यांचा अड्डा बनला असून दररोज छोटे-मोठे वाद आणि हाणामाऱ्या घडत आहेत. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या महिला आणि मुलींना अश्लील इशारे केले जात असून त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच दुकानात दारू पिऊन आलेल्या हुल्लडबाज तरुणांनी स्थानिक दुकानदाराला बेदम मारहाण केली होती, ज्यामुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हा केवळ कागदपत्रांच्या फसवणुकीचा विषय नसून शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी जोडलेला गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या जागेवरील हे दारू दुकान तात्काळ हटवून, बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्यांवर त्वरित एफआयआर (FIR) दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील तक्रार मुख्याधिकारी (संगमनेर नगर परिषद) यांच्याकडे सादर करण्यात आली असून, त्याच्या प्रती नगराध्यक्षा, संगमनेर नगर परिषद, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहिल्यानगर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, संगमनेर यांना दिल्या आहेत.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्याचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर आता पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या भूमाफियांवर आणि फसवणूक करणाऱ्यांवर काय कडक कारवाई करते, याकडे संपूर्ण संगमनेर शहराचे लक्ष लागले आहे.

