अश्विनाथ महाराज परिसर विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही — आमदार अमोल खताळ
संगमनेर/प्रतिनिधी :
पारेगाव बुद्रुक आणि निमोण या दोन्ही गावांच्या सरहद्दीवरील सर्वधर्मीयांच्या श्रद्धेचे, आस्थेचे आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या अश्विनाथ महाराज देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील निमोण परिसरात आमदार अमोल खताळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी अश्विनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच पारेगाव बुद्रुक येथे महाराजांच्या मानाच्या काठीची विधिवत पूजा केली. त्यानंतर अश्विनाथ महाराजांच्या गडावर जाऊन भगवी शाल अर्पण करून दर्शन घेत आशीर्वाद घेतला. गणपती व अश्विनाथ महाराजांची महाआरतीही त्यांच्या हस्ते करण्यात आली.

यात्रोत्सवानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविक, ग्रामस्थ तसेच विविध धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार खताळ म्हणाले, “तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या परिसराचा विकास केला जाईल. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. गावांमध्ये छोटे-मोठे प्रश्न असतात. हे प्रश्न कोणताही वाद न वाढविता एकत्रित येऊन सामंजस्याने आणि सर्वांच्या सहकार्याने सोडविले पाहिजेत. यासाठी प्रशासनाचीही मोलाची साथ मिळत आहे. नागरिक, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या समन्वयातून या परिसराचा विकास अधिक वेगाने करता येईल.”
यावेळी निमोण येथील महायुतीचे संदीप देशमुख, श्रीकांत गोमासे, कैलास पाटील, कविता पाटील, अमोल आंधळे तसेच पारेगाव येथील सुरेश दळवी, किशोर गडाख, कैलास गोर्डे, रावसाहेब गडाख, बाबासाहेब गोरडे, पुंजाहारी गडाख यांच्यासह ग्रामस्थ, भाविक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

