अश्विनाथ गड सामाजिक एकतेचे प्रतीक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर (प्रतिनिधी) –
अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवरील पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ गडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक यात्रा उत्साहात संपन्न झाली. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रितपणे यात्रा साजरी करतात, हे या तीर्थक्षेत्राचे वैशिष्ट्य असून अश्विनाथ गड सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटी सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
निमोण येथे अश्विनाथ गडावर जाणाऱ्या मानाच्या काठीचे पूजन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली.

अश्विनाथ गड हे पारेगाव बुद्रुक, चिंचोली गुरव, पिंपळे, निमोण, देवकवठे तसेच सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे, घोटेवाडी व कहांडळवाडी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेत अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गडाच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिल्याचे थोरात यांनी सांगितले. आर्किटेक्ट बी.आर. चकोर यांनीही अश्विनाथ गडाच्या विकासासाठी बाळासाहेब थोरात व आमदार माणिकराव कोकाटे यांच्या योगदानाचा उल्लेख केला.

