घारगाव हद्दीत लुटमार करणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद
जबरी चोरी व चैन स्नॅचिंगचे ३ गुन्हे उघडकीस ; ४१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर प्रतिनिधी –
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटमार करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. दिनेश राजाराम जाधव (वय २५, रा. कौठे बु., ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून जबरी चोरी व चैन स्नॅचिंगचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
१८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री संतोष सखाराम देवकाते (वय ४०, रा. चितळकरवस्ती, साकूर, ता. संगमनेर) हे बिरोबा मंदिर, साकूर येथे रस्त्याच्या कडेला कार लावून झोपले होते. त्यावेळी दोन अज्ञात आरोपींनी त्यांना दमदाटी करून मारहाण केली आणि रोख रक्कम व मोबाईल जबरीने काढून घेतला. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असताना २६ ऑगस्ट रोजी दिनेश जाधव हा त्याच्या साथीदारासह गुन्ह्यात सहभागी असून घारगाव येथून कौठे-वनकुटे रोडने मोटारसायकलवरून घरी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार साईसिद्धी हॉस्पिटल, घारगाव परिसरातील कौठे-वनकुटे रोडवर सापळा रचण्यात आला.
संशयित आरोपी पोलिसांना दिसताच त्याने मोटारसायकल रस्त्यावर टाकून नाल्यातून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून दिनेश जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १,१०० रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ३० हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची एमएच-१४-सीएन-८०६८ क्रमांकाची मोटारसायकल असा एकूण ४१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने हा गुन्हा नवनाथ उर्फ दगडया भाऊसाहेब मधे (रा. वांगदरी पिंपळदरी, ता. अकोले) याच्यासह केल्याची कबुली दिली. नवनाथ मधे हा फरार आहे.

चौकशीत आरोपीने जुलै २०२६ मध्ये बोटा गावातील एका महिलेच्या गळ्यातील सोने जबरीने हिसकावल्याची तसेच काही दिवसांपूर्वी सकाळच्या वेळी माऊली घाटात पाणी पिण्याचा बहाणा करून एका वृद्ध महिलेच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर चाकूने मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची माहिती दिली.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार घारगाव पोलीस ठाण्यातील पुढील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत :
1. गु.र.नं. ३३१/२०२६ — बीएनएस कलम ३०९ (६), ३ (५)
2. गु.र.नं. ३२६/२०२६ — बीएनएस कलम ३०९ (६)
3. गु.र.नं. ३०३/२०२६ — बीएनएस कलम ३०४ (२)

ताब्यातील आरोपीला पुढील तपासासाठी घारगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास घारगाव पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.
