मावा-गुटखा विक्रेत्यांवर गुन्हे शाखेचे छापे
पाच ठिकाणी कारवाई ; ८९ हजार ३६६ रुपयांचा गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू जप्त
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, सोनई आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावा, गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांविरोधात पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण ८९ हजार ३६६ रुपये किमतीचा पानमसाला (गुटखा), मावा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी या पथकांनी सोनई व बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. या पाच कारवायांमध्ये एकूण आठ आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये काही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोनई येथे दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत शब्बीर महेताब सय्यद (वय ४५, रा. सोनई) याच्याकडून १३ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल, तर दुसऱ्या कारवाईत जावेद उस्मान शेख (वय ५२, रा. हलवाई गल्ली, सोनई) याच्याकडून २० हजार २४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बेलवंडी येथे तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली. सोमनाथ उर्फ गणेश प्रकाश घोरपडे व संकेत अशोक पाचपुते यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात ५ हजार ३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील संकेत पाचपुते फरार आहे.
तसेच विजय सतीष चोरडिया व कमलेश मुरली कृपालीनी यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कमलेश कृपालीनी फरार आहे. तिसऱ्या कारवाईत जाकीर इसाक शेख व फयाज तांबोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ३४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील फयाज तांबोळी फरार आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच संबंधित प्रकरणांमध्ये कलम ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, अतुल लोटके, विकास साळवे, सतीष भवर, गणेश लोंढे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, रणजीत जाधव, शामसुंदर जाधव, प्रताप देवकाते, मनोज साखरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे व अमोल कोतकर यांच्या पथकाने केली.
