बेकायदेशीर मावा अड्डा उद्ध्वस्त !
इलेक्ट्रीक मशीन, मावा, सुगंधित तंबाखूसह १८ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त ; दोघे ताब्यात
शेवगाव | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने शेवगाव येथे सुरू असलेला बेकायदेशीर मावा तयार करण्याचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन इलेक्ट्रीक मशीनसह मावा, सुपारी चुरा, सुगंधित तंबाखू, कलर, वजन काटे आणि दोन कार असा एकूण १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य संशयित फरार आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पथक नियुक्त केले होते. त्यानुसार पोलीस अंमलदार गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, रोहित येमुल, सतीष भवर आणि बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली.

पत्र्याच्या शेडमध्ये मशीनवर तयार केला जात होता मावा
२८ ऑगस्ट रोजी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भगतसिंग चौक, शेवगाव येथील आसिफ रहेमान तांबोळी हा साथीदारांच्या मदतीने कोरडे वस्ती परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रीक मशीनच्या सहाय्याने सुगंधित तंबाखू व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करून त्याची विक्री करत आहे.
माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी शेडमध्ये दोन जण इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करताना आढळून आले. पोलिसांनी वसीम सत्तार तांबोळी (वय ३८) आणि शाहरूख उर्फ जावेद सलीम शेख (वय २७) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत हे दोघे आसिफ रहेमान तांबोळी याच्या सांगण्यावरून मावा तयार करत असल्याचे समोर आले. तयार केलेला मावा आसिफ हा कारमधून नेऊन विक्री करत असल्याची माहितीही मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुद्देमालाचा तपशील
कारवाईमध्ये पोलिसांनी दोन इलेक्ट्रीक मशीन, ६५ किलो सुगंधित तंबाखू, ८० किलो तयार मावा, ८०० किलो सुपारी चुरा, ३० किलो सुगंधित तंबाखू, ५ किलो कलर, दोन वजन काटे तसेच सॅन्ट्रो कार (एमएच-१५-सीडी-९०८६) आणि टाटा झेस्ट कार (एमएच-१७-बीएफ-८३३३) असा एकूण १८,३३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६५७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस ठाणे करीत आहे.
