गांजाची शेती उघड ; १७० किलो गांजा जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
‘नशामुक्त अहिल्यानगर’ अभियानांतर्गत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला नेवासा पोलिसांनी आणखी एक मोठे यश मिळवले आहे. नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडुले गावच्या शिवारात शेतीमध्ये गांजाची झाडे लावून त्याची सुकवून नेवासा तालुक्यात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तब्बल १७० किलो गांजा तसेच ४० ते ५० जिवंत गांजाची झाडे जप्त केली.
पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी ‘नशामुक्त अहिल्यानगर’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अमली पदार्थांविरोधात प्रभावी मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक वाकचौरे तसेच शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांकडून ड्रग्सविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे.

गोपनीय माहितीवरून छापा
दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना वडुले गावच्या शिवारात राहणारे शेतमालक बबन शंकर देशमुख (वय ६०) यांच्या मालकीच्या शेतीमध्ये गांजाची शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या शेतीतील गांजाची झाडे सुकवून नेवासा तालुक्यात विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सरकारी पंचांच्या उपस्थितीत संबंधित शेतीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये ४० ते ५० गांजाची जिवंत झाडे तसेच वाळवलेला एकूण १७० किलो गांजा आढळून आला. पंचांसमक्ष हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नेवासा पोलिसांनी सांगितले आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
अमली पदार्थांची विक्री, साठवणूक अथवा सेवनासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने डायल ११२ किंवा नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, हवालदार काळोखे, वाघमोडे, शेळके, गाजरे, बर्डे, अप्पा वैद्य, पोलीस कॉन्स्टेबल गवळी, वाघ, नारायण दमाळे, गीता पवार, सुमित करंजकर तसेच होमगार्ड सांगळे सहभागी झाले होते.
