आमदाराच्या समर्थकाची पोलिसांच्या समोरच मुजोरी !
आमदार अमोल खताळांचा सहकारी संदेश देशमुखविरुद्ध ‘गुन्हा’ दाखल !
संगमनेर प्रतिनिधी –
एकीकडे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेप्रश्नी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या ‘आमदारकी पणाला लावण्याच्या’ घोषणेवरून जनतेमध्ये उपहासात्मक चर्चा होत असतानाच, दुसरीकडे त्यांच्या सहकाऱ्यांची मुजोरी आता थेट पोलिसांच्या उपस्थितीतच चव्हाट्यावर आली आहे. खांडगाव येथील २५ वर्षीय तरुण प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याला पोलिसांच्या ताब्यात असतानाच, आमदार अमोल खताळ यांचा सहकारी संदेश बाळासाहेब देशमुख (रा. राजापूर) याने थेट पोलिसांच्या समोरच डाव्या डोळ्यावर व गालावर चापटा मारून जबर दुखापत केली आणि “तुला मारून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

नेमकी घटना काय घडली ?
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या NCR No. 1155/2026 (दिनांक ३१/०८/२०२६) नुसार तक्रारदार प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (वय २४, व्यवसाय: शेती, रा. खांडगाव ग्रामपंचायत शेजारी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीचा सविस्तर मजकूर खालीलप्रमाणे आहे:
दिनांक ३१/०८/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रसाद गुंजाळ हे नेहमीप्रमाणे खांडेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यानिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील पटांगणात बसलेले असतानाच पोलीस निरीक्षक समिर बारवकर साहेब व त्यांच्यासोबत इतर पोलीस कर्मचारी तेथे आले. तसेच विद्यमान आमदार अमोल धोंडीबा खताळ (वय ४८) हेदेखील दर्शनासाठी तेथे येणार असल्याचे सांगत पोलिसांनी प्रसाद गुंजाळ यांना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढून पोलीस सातपुते व पोलीस आगलावे यांच्या ताब्यात दिले.

पोलीस जेव्हा प्रसाद गुंजाळ यांना पोलीस गाडीकडे घेऊन जात होते, नेमकं त्याच वेळी पोलिसांच्या ताब्यात असतानाच विद्यमान आमदार अमोल खताळ यांचा सहकारी संदेश बाळासाहेब देशमुख (रा. राजापूर) हा समोरून आला. कसलाही विचार न करता त्याने पोलिसांच्या समक्षच प्रसाद गुंजाळ यांच्या डाव्या डोळ्यावर व डाव्या गालावर हाताने दोन-तीन चापटा मारून जबर दुखापत केली आणि “जीवे मारून टाकीन” अशी उघडउघड धमकी दिली.
पोलिसांनी मध्यस्थी करून मारहाणीतून सोडवले आणि जखमी प्रसाद गुंजाळ यांना पोलीस गाडीतून ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी (संगमनेर) येथे नेऊन वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणून संदेश बाळासाहेब देशमुख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 115(2) (मारहाण करणे) आणि कलम 352 (अपमान व धमकी देणे) अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची (NCR) नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. कॉ. सोनवणे करत आहेत.

“पोलिसांच्या नाकाखालीच मारहाण” कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा !
एका सामान्य नागरिकाला पोलीस अधिकाऱ्यांच्या (पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या उपस्थितीत) ताब्यात घेतलेले असताना आमदाराचा सहकारी थेट येऊन पोलिसांच्या समोरच मारहाण करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो, यावरून संगमनेरमध्ये ‘खाकी’चा धाक उरला आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदारांच्या दबावाखाली पोलीस लाचार झाले आहेत का, असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.
एकीकडे नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग रद्द करून महायुती सरकारने अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्याचा विश्वासघात केला आहे. काकोडकर समितीच्या नावाने २५ दिवस उलटूनही सरकारने कोणतीही हालचाल केलेली नाही, हे आमदार सत्यजित तांबे यांनी उघड पाडले आहे. रेल्वेसाठी ‘आमदारकी पणाला लावू’ असे दावे करणारे आमदार अमोल खताळ यांची कृती मात्र शून्य ठरली असल्याचे आरोप होत असतानाच त्यांचे कार्यकर्ते आता सामान्य नागरिकांवर, मंदिराच्या आवारात पोलिसांदेखत हात उचलण्याची हिंमत करत आहेत.
