लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलांना कारमध्ये बसवून, धमकावून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने काढून घेऊन महिलांना कारमधून खाली ढकलून देणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. आरोपींकडून एकूण ८ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी श्रीमती द्वारकाबाई उत्तम डाडर (वय ६५, रा. नागलवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) या मिरजगाव येथे जाण्यासाठी रस्त्यावर थांबल्या असताना अज्ञात पुरुष व महिला आरोपींनी चारचाकी वाहनातून मिरजगाव येथे सोडण्याचा बहाणा करून त्यांना गाडीत बसविले. काही अंतरावर नेल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र जबरीने काढून घेतले व त्यांना गाडीतून ढकलून देत आरोपी पसार झाले. याप्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असताना २५ ऑगस्ट रोजी माहिती मिळाली की, हा गुन्हा लक्ष्मण जामदार (रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा) याने कोमल भाऊसाहेब नन्नवरे (रा. डावरवाडी, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) हिच्यासह केला आहे. त्यानुसार पोलिसांनी तारकपूर बसस्थानक परिसरातून कोमल नन्नवरे हिला ताब्यात घेतले. त्यानंतर कोंबडीवाला मळा, अहिल्यानगर येथून लक्ष्मण मोहन जामदार यालाही ताब्यात घेण्यात आले.

आरोपींची चौकशी केली असता त्यांनी नागलवाडी येथील वृद्ध महिलेला कारमध्ये लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिचे मंगळसूत्र जबरीने काढून घेतल्याची कबुली दिली. तसेच पाथर्डीजवळ पाथर्डी-अहिल्यानगर रोडवरही एका वृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतल्यानंतर महिलेला कारमधून खाली ढकलून दिल्याची माहिती त्यांनी दिली.

या कारवाईत मिरजगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ३१७/२०२६ आणि पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९८०/२०२६ असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी पंचांसमक्ष लक्ष्मण मोहन जामदार याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली विनाक्रमांकाची हुंदाई AURA कार, एमएच-४२-बीएन-८९९९ क्रमांकाची नंबर प्लेट, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण ८ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नागलवाडी येथून चोरी केलेले सोन्याचे दागिने विकून मिळालेले पैसे बँक खात्यात जमा केल्याची माहितीही आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी मिरजगाव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!