पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई ; सिने स्टाईल पाठलाग करून ५१ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
पोलिसांनी गुटख्याविरोधात मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच आयशर टेम्पो असा एकूण ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खर्डा पोलिसांनी केली.
खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उज्वलसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका आयशर टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन धाराशिवकडून बीडकडे शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गाने वाहन जाणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे जातामार्ग फाटा, खर्डा येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयित टेम्पो चालक वाहन घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्यास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबविता सुसाट वेगाने बीडकडे नेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तत्परता दाखवत सिने स्टाईल पाठलाग करून सदर वाहन तेलगाव फाट्याजवळ ताब्यात घेतले.

टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य सुगंधी सुपारी मोठ्या प्रमाणात आढळून आली. जप्त मुद्देमालामध्ये प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारीची अंदाजे किंमत ४१ लाख ४१ हजार ४८ रुपये, तर आयशर टेम्पोची अंदाजे किंमत १० लाख रुपये असून, एकूण ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राजू मेहबूब शेख, रा. भेंडाटाकळी, ता. गेवराई, जिल्हा बीड, प्रदीप विष्णू गायकवाड, रा. च-हाटा फाटा, तालुका जिल्हा बीड आणि तुषार नामदेव कुसमकर, रा. बीड यांच्याविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर, हवालदार संभाजी शेंडे, गोकुळ इंगळे, रावसाहेब नागरगोजे, शशिकांत म्हस्के, वैजनाथ मिसाळ, बाळू खाडे, आनंद धनवडे, विष्णू आवारे, अशोक बडे, राहुल खेडकर, होमगार्ड तानाजी जायभाय व महादेव कदम, राहुल भिसे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पो.उप.निरीक्षक अशोक खेडकर करीत आहेत.
