संगमनेर तालुक्यात घरफोडी ; पाच लाखांची रोकड लंपास
संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील कऱ्हे येथे घरफोडीची घटना घडली असून, घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली ५ लाख रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील लक्ष्मण सानप (वय ४९ वर्षे, व्यवसाय खासगी नोकरी, मूळ रा. कऱ्हे, ता. संगमनेर, हल्ली रा. मीरा रोड, मुंबई) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सुनील सानप हे कऱ्हे, ता. संगमनेर येथील आपल्या राहत्या घरी नसताना १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून ते २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा कोणत्यातरी अज्ञात साधनाच्या साहाय्याने तोडला. त्यानंतर चोरट्याने घरात प्रवेश करून गोदरेज कपाटातील कपड्यांखाली ठेवलेल्या प्लास्टिक बॉक्समधील ५,००,००० रुपये रोख रक्कम चोरून नेली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची वेळ २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०.४१ वाजता अशी नोंद आहे. या प्रकरणात डॉक्टर कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

घर बंद असल्याची संधी साधून चोरी
फिर्यादीच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडण्यात आला. त्यानंतर घरात प्रवेश करून गोदरेज कपाटातील कपड्यांच्या खाली ठेवलेली रोख रक्कम असलेली प्लास्टिक बॉक्स चोरून नेण्यात आली. घर बंद असल्याची संधी साधून ही घरफोडी करण्यात आल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून स्पष्ट होते.
या घटनेत एकूण ५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
