पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका ; दरेवाडी येथून दोन आरोपी ताब्यात

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

कोपरगाव येथून पळवून नेलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेऊन सुखरूप सुटका केली. या प्रकरणात नूर राजू पठाण आणि समीर मनोज सोनगत या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कोपरगाव येथील फिर्यादी यांची १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोणीतरी अज्ञात इसमांनी पळवून नेली होती. याबाबत फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४६४/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुलीचा शोध घेणाऱ्या पथकामध्ये पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, आजिनाथ पाखरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, अभिजीत आरकल, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे आणि किरण ठुबे यांचा समावेश होता. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथकाला गुन्ह्याचा समांतर तपास करून पीडित मुलीचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले.

तपास पथक पीडित मुलगी तसेच संशयित आरोपींचा शोध घेत असताना दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. पीडित मुलीला नूर राजू पठाण, (रा. आंबेडकरनगर, राहाता) याने पळवून आणले असून तो पीडित मुलीसह हरीमळा, दरेवाडी, सोलापूर रोड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरीमळा, दरेवाडी, सोलापूर रोड, अहिल्यानगर येथे जाऊन पीडित मुलगी आणि संशयित इसमाचा शोध घेतला. त्यावेळी पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली आणि नूर राजू पठाण, (वय १९ वर्षे, रा. आंबेडकरनगर, राहाता, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या नूर राजू पठाण याच्याकडे तसेच पीडित मुलीकडे पोलिसांनी अधिक विचारपूस केली. त्यावेळी ते कोपरगाव येथून अहिल्यानगर येथे पळून आले असून, कोपरगाव येथून पळून येण्यासाठी समीर मनोज सोनगत याने मदत केली असल्याचे समोर आले. तसेच मागील दोन दिवसांपासून ते समीर मनोज सोनगत याच्याकडेच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी समीर मनोज सोनगत, (वय २२ वर्षे, रा. हरीमळा, दरेवाडी, ता. अहिल्यानगर) यालाही ताब्यात घेतले. अशाप्रकारे या प्रकरणात नूर राजू पठाण आणि समीर मनोज सोनगत या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पीडित अल्पवयीन मुलीसह पुढील तपासकामी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, आजिनाथ पाखरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, अभिजीत आरकल, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे आणि किरण ठुबे यांनी केली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!