घारगाव पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा ; २ लाख ५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त — पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर प्रतिनिधी : 

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारोळे पठार गावाच्या शिवारात पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून २ लाख ५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कारवाईत तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना पाच जण आढळून आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना २१ ऑगस्ट २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सारोळे पठार गावाच्या शिवारात बबन मुरलीधर फटांगरे यांच्या शेतामध्ये पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही इसम पैसे लावून ‘तिरट’ नावाचा हारजितीचा जुगार खेळत आहेत. या ठिकाणी छापा टाकल्यास जुगार खेळणारे इसम मुद्देमालासह मिळून येतील, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टाफ व पंचांसह पोलिसांनी संबंधित शेतातील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जाऊन पाहणी केली. त्यावेळी काही इसम हातामध्ये पैसे व पत्ते घेऊन पत्त्यांवर डावामध्ये पैसे टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून संबंधितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये गणेश बाळासाहेब घुले (वय ३१, रा. सारोळे पठार, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), रमेश हरिभाऊ मोहिते (वय ३८, रा. सारोळे पठार, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), संतोष रामकृष्ण यशवंत (वय ४७, रा. सारोळे पठार, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), किरण लक्ष्मण मोहिते (वय ३७, रा. सारोळे पठार, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि रमेश शिवराम घुले (वय ५५, रा. सारोळे पठार, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.

या कारवाईत पोलिसांनी ५ हजार ८५० रुपयांची रोख रक्कम, १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली तसेच ५० हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी नमूद पाचही आरोपींविरुद्ध घारगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३२/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, श्रीरामपूर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, संगमनेर विभाग, संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलीस नाईक नारायण ढोकरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबूराव गाडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे आणि पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत नेहे, नेमणूक घारगाव पोलीस ठाणे, यांनी सहभाग घेतला.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!