दरोड्याचा कट उघडकीस ; २ गावठी कट्टे व ४ काडतुसे जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू असलेल्या दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्याचा कट उधळून लावत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे, लोखंडी टॉमी, मिरची पावडर, सहा मोबाईल फोन आणि दोन विनाक्रमांकाच्या कार असा एकूण ३२ लाख १९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी हे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाच इसम दोन काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या चारचाकी वाहनांसह एमआयडीसी ते शेंडी जाणाऱ्या बायपास रोडवरील गुरुदत्त मित्रमंडळ, लवणवाडी पाटीजवळील कच्च्या रस्त्याच्या आडोशाला दरोडा घालण्याच्या तयारीत थांबले आहेत.

माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनांजवळ पाच इसम संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक माहिती न मिळाल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये शाहरूख रज्जाक शेख (३४, रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर), इम्रान अन्वर पठाण (२३, रा. टाकळी, ता. कोपरगाव), तन्जीम नदिम शेख (२६, रा. मिलननगर, नांदगाव रोड, येवला), फिरोज चाँद शेख (३५, रा. ताजपार्क, दत्तमंदिराजवळ, नांदगाव रोड, येवला) आणि रेहान रौफ शेख (३०, रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे.

३२ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त
पंचांसमक्ष अंगझडती घेतल्यानंतर आरोपींकडून १ लाख ४ हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे, १०० रुपये किमतीची लोखंडी टॉमी, मिरची पावडर, ४ लाख १५ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल, १५ लाख रुपये किमतीची विनाक्रमांकाची काळ्या रंगाची हुंदाई क्रेटा कार आणि १२ लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची टाटा हॅरियर कार, असा एकूण ३२ लाख १९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील शाहरूख रज्जाक शेख व इम्रान अन्वर पठाण यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, जप्त गावठी कट्टे व जिवंत काडतुसे आसिफ उर्फ आश्यू पठाण (पूर्ण नाव माहिती नाही, रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) आणि राजेंद्र भाऊसाहेब गांगुर्डे (रा. अशोकनगर फाटा, श्रीरामपूर) यांच्याकडून विकत घेतल्याची माहिती त्यांनी दिली. हे दोघे सध्या फरार आहेत.
दोघांवर यापूर्वीही गुन्हे दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, शाहरूख रज्जाक शेख याच्यावर श्रीरामपूर शहर, नारायणगाव, लोणी, श्रीरामपूर तालुका, नगर तालुका, शिर्डी, कॅम्प आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्यांत आर्म्स ॲक्ट, दरोडा, जबरी चोरी व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच इम्रान अन्वर पठाण याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मपोकाक, दरोड्याची तयारी, आर्म्स ॲक्ट तसेच इतर कलमांनुसार गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरोडा घालण्याच्या तयारीत हे आरोपी आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६०/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (४), ३१० (५) सह आर्म्स ॲक्ट ३/२५, ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे तसेच पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, विजय पवार, सुनिल पवार, बिरप्पा करमल, राहुल डोके, आजिनाथ पाखरे, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार, भगवान धुळे व सोनल भागवत यांच्या पथकाने केली.
