गाढवे चोरणारी आणि दरोड्याचा डाव आखणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

सहा आरोपी ताब्यात ; १० लाख ४८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पैठण, पाथर्डी आणि राहाता येथील गाढव चोरीचे तीन गुन्हे उघडकीस

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. करंजी घाटाच्या पायथ्याशी संशयास्पदरीत्या थांबलेल्या सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीत गाढव चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा झाला. आरोपींकडून पिकअप वाहन, पाच मोबाईल, लोखंडी कत्ती, कटावणी आणि मिरची पूड असा एकूण १० लाख ४८ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यात वेळोवेळी दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, फुरकान शेख, रोहित येमुल, सागर ससाणे, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक तयार करून पेट्रोलिंगसाठी रवाना केले होते.

करंजी घाटाच्या पायथ्याशी सहा जण ताब्यात

दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी हे पथक पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत पाच ते सहा इसम एका पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून पाथर्डी-अहिल्यानगर रोडवरील करंजी घाटाच्या पायथ्याशी संशयास्पदरीत्या थांबले असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष करंजी घाटाच्या पायथ्याशी जाऊन खात्री केली. तेथे अंधारात एका पांढऱ्या रंगाच्या पिकअपजवळ सहा इसम संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना अंधारात थांबण्याचे कारण विचारले. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी सहाही जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये साईकुमार लक्ष्मीनारायण पालपत्ती (वय २६, रा. चिरालामंडल, इपुलपालम, जि. बापटला, आंध्रप्रदेश), यशबाबु व्यंकटेश मोगिली (वय ४५, रा. व्याटापाल सेंटर, जि. बापटला, आंध्रप्रदेश), सुधाकर भास्करराव देवारकोडा (वय ४२, रा. चिरालामंडल, इपुलपालम, जि. बापटला, आंध्रप्रदेश), अंजी श्रीनु कुमाकुला (वय २७, रा. वडिचेराकुरू, जि. गुंटूर, आंध्रप्रदेश), नागेश वेंकटेश पेनड्रा (वय ४२, रा. गांधीनगर, मांगमुररोड, जि. वंगुल प्रकाशम, आंध्रप्रदेश) आणि सतीष नागेश्वराव पालेपु (वय ३६, रा. वेटपालम, जि. बापटला, आंध्रप्रदेश) यांचा समावेश आहे.

पिकअपसह १० लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेतली. त्यांच्या ताब्यातून ४७ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल, १० लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पिकअप (क्र. एपी-३९-युडी-१४१६), ५०० रुपये किमतीची एक लोखंडी कत्ती, ५०० रुपये किमतीची एक लोखंडी कटावणी आणि ५० रुपये किमतीची मिरची पूड असा एकूण १० लाख ४८ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गाढव चोरीच्या तीन गुन्ह्यांचा उलगडा

ताब्यातील आरोपी साईकुमार लक्ष्मीनारायण पालपत्ती याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी त्याने ताब्यातील आरोपींसह रमेश सिनु पेंड्राल (रा. चिरकुपल्ली, जि. गुंटूर, आंध्रप्रदेश), कुंबा शिवाजी मनी, के. रामबाबु आणि सिनु उर्फ मुक्कल (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी मिळून मागील काही दिवसांत पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर तसेच पाथर्डी आणि राहाता, जि. अहिल्यानगर येथून गाढवांची चोरी करून ती आयशर गाडीतून घेऊन गेल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. कुंबा शिवाजी मनी, के. रामबाबु आणि सिनु उर्फ मुक्कल हे एस. आर. कॉलेजजवळ, विजयवाडा, आंध्रप्रदेश येथील असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली. त्यामध्ये गाढव चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले.

१) पैठण पोलीस स्टेशन, जि. छत्रपती संभाजीनगर — गु.र.नं. ३०४/२०२६, बीएनएस कलम ३०३ (२)

२) पाथर्डी पोलीस स्टेशन, जि. अहिल्यानगर — गु.र.नं. ९३२/२०२६, बीएनएस कलम ३०३ (२)

३) राहाता पोलीस स्टेशन, जि. अहिल्यानगर — गु.र.नं. २७०/२०२६, बीएनएस कलम ३०३ (२)

दरोड्याच्या तयारीप्रकरणी गुन्हा दाखल

ताब्यातील आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीसह मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (४), ३१० (५) सह आर्म्स ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वातील सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, फुरकान शेख, रोहित येमुल, सागर ससाणे, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!