हत्यार तस्करीचा पर्दाफाश ; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
जिल्ह्यातील अवैध शस्त्रास्त्र वाहतुकीला चाप लावत स्थानिक गुन्हे शाखेने शनिशिंगणापूर परिसरात एक धाडसी कारवाई करत गावठी कट्टा विक्रीचा प्रयत्न उधळून लावला. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांचा शोध सुरू असताना ही मोठी कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील अनिल सिताराम सावंत (वय ३०) हा गावठी कट्टा घेऊन शनिशिंगणापूर येथील हॉटेल ब्लू ऑरगॅनिक रसवंती सेंटरजवळ विक्रीसाठी येणार आहे. ही खबर मिळताच पथकाने सापळा रचून संशयिताला रंगेहाथ पकडले.

आरोपीच्या झडतीत पोलिसांना १ गावठी कट्टा (किंमत ₹५०,०००) आणि २ जिवंत काडतुसे (किंमत ₹२,०००) असा एकूण ₹५२,००० किमतीचा शस्त्रसाठा हाती लागला. चौकशीदरम्यान आरोपीने हे शस्त्र वळणपिंप्री येथील गणेश शहाराम शिंदे याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. शिंदे सध्या फरार असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी शोधमोहीम तीव्र केली आहे.
शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम ३/२५ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १४१/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोसई संदिप दरवडे आणि पथकातील अंमलदारांनी यशस्वी केली.
