‘ज्ञानेश्वरी’ नैराश्यावरची संजीवनी; संत ज्ञानेश्वर युवकांचे आदर्श व्हावेत — ह.भ.प. रोहिणीताई परांजपे
संगमनेरात ‘मनःशांती व जीवनविकास’ व्याख्यानमालेचा शुभारंभ ; श्रोत्यांची मोठी उपस्थिती
संगमनेर (प्रतिनिधी) :
बालवयातच मातृ-पितृछत्र गमावून प्रचंड हालअपेष्टा, बहिष्कार, हेटाळणी आणि अपमान सहन करूनही संत ज्ञानेश्वर माऊली यांनी निराश न होता संपूर्ण विश्वाला आशेची दिशा दिली. त्यामुळे आजच्या युवकांसाठी संत ज्ञानेश्वर हे आदर्श असायला हवेत. त्यांच्या जीवनातील कडवट अनुभवांचे रूपांतर त्यांनी ज्ञान आणि अध्यात्माच्या अमृतात केले. ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हा नैराश्य, वैफल्य आणि नकारात्मक मनःस्थितीवर मात करण्यासाठी आशेची संजीवनी ठरू शकतो, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुविख्यात कीर्तन-प्रवचनकार तथा समाजप्रबोधनकार ह.भ.प. सौ. रोहिणीताई परांजपे यांनी केले.
श्रावण मासानिमित्त राजस्थान युवक मंडळाच्या वतीने सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘मनःशांती व जीवनविकास’ व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी ‘विश्व स्वधर्म सूर्य पाहो’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ह.भ.प. रोहिणीताई परांजपे बोलत होत्या.

मालपाणी लॉन्स याेेथे झालेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती. प्रवचनातून रोहिणीताईंनी संतविचार, जीवनमूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा प्रभावी उलगडा केला.
“संतांचे विचार ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे. संतांनी प्रत्येकाला दाता व्हायला शिकविले; मात्र हव्यासापोटी माणूस इतरांकडून ओरबाडून घ्यायला शिकला आणि त्यातच त्याच्या दुःखाचे मूळ आहे,” असे त्यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निळोबाराय, संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांच्यासह विविध संत-महंतांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या ओव्या आणि अभंगांचे त्यांनी आपल्या रसाळ शैलीत निरूपण केले. माणसाने लौकिक अर्थाने कितीही धन कमावले, तरी आर्थिक संपत्तीबरोबर विचारांचे धन असेल तरच तो खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो, असे त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केले.

राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगपती मनीष मालपाणी यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेमागील भूमिका स्पष्ट केली. कार्याध्यक्ष सागर मणियार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर सूत्रसंचालन ओम इंदाणी यांनी केले.
यावेळी राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगपती मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सागर मणियार, नगरसेविका रचना मालपाणी, उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, सचिव कृष्णा असावा आणि खजिनदार वेणुगोपाल कलंत्री आदी उपस्थित होते.
