गणेश विसर्जनासाठी एकविरा फाउंडेशनचे ४०० स्वयंसेवक सज्ज

निर्माल्य संकलनासह नागरिकांच्या मदतीची व्यवस्था ; पर्यावरणपूरक विसर्जनाचे डॉ. जयश्री थोरात यांचे आवाहन

संगमनेर प्रतिनिधी –

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन सुरळीत आणि सुरक्षित पार पडावे, यासाठी एकविरा फाउंडेशनचे ४०० युवक-युवती स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील सहा वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.

शहर व तालुक्यातील विसर्जनस्थळी स्वयंसेवक नागरिकांना मदत करणार असून, निर्माल्य संकलन व परिसर स्वच्छतेची जबाबदारीही सांभाळणार आहेत. जाणता राजा मैदान येथे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून नदीकाठीही विसर्जनासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. संगमनेर नगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

नदीपात्रात पाणी असल्याने नागरिकांनी खोल पाण्यात न जाता सुरक्षित ठिकाणी विसर्जन करावे, तसेच निर्माल्य नदीत न टाकता संकलनासाठी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.

विसर्जनस्थळी सुरक्षा पथके आणि पोहण्यात तरबेज तरुण तैनात राहणार असून, गणेश मिरवणुकीदरम्यान नागरिकांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत.

पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छता आणि सुरक्षितता यांचा विचार करून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करावे, असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!