वनविभागाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून निझर्णेश्वर मंदिराचा विकास करणार – आमदार अमोल खताळ

मंदिराच्या विकासासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा

संगमनेर / प्रतिनिधी : 

कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने मंदिराच्या विकासकामांमध्ये कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करून मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते श्री निझर्णेश्वर मंदिरात अभिषेक, पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते.

मंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीत असल्याने विकासकामांसाठी आवश्यक त्या परवानग्या व कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागत आहे. मंदिर परिसरासाठी वनविभागाची जागा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असून, संबंधित मंत्री व शासनस्तरावर याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.

निझर्णेश्वर मंदिराची वास्तू जुनी झाल्याने भाविक, ग्रामस्थ आणि देवस्थानशी संबंधित घटकांची सहमती घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांचे योगदान, ग्रामस्थांचे सहकार्य आणि शासनाची मदत यांचा समन्वय साधून मंदिराचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून वनजमिनीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येईल. पुढील वर्षी श्रावण महिन्यापर्यंत नवीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करून शिवभक्तांना नव्या मंदिरात दर्शनाचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे,” असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

मंदिराच्या विकासासोबतच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असून, परिसराचे सौंदर्य आणि निझर्णेश्वर मंदिराचे धार्मिक महत्त्व जपून विकासकामे केली जातील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सचिन शिंदे, पप्पू गाढे, सुमित काशिद, डॉ. संदीप जोंधळे, महेश जोंधळे, भारत जोंधळे, विजय वामन, आदित्य पवार, रमेश शिंगोटे, प्रज्वल जोंधळे, अमोल जोंधळे, रणजीत जाधव, देवस्थान ट्रस्टचे बबन पवार, दिलीप जोंधळे, गंगाधर वायकर, बाळासाहेब जोंधळे, नंदू पानसरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिवभक्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!