अहिल्यानगरात ‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरी ; राज्यभरातील ४५० बालकलाकारांचा सहभाग
अहिल्यानगर | प्रतिनिधी
बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय महोत्सवाची महाअंतिम फेरी रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात रंगणार आहे. यंदाचा महोत्सव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना समर्पित करण्यात आला असून, महाराष्ट्रातील विविध भागांतून निवड झालेले ४५० हून अधिक बालकलाकार अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.
राज्यभरातील २२ केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीत सुमारे २,३०० बालकलाकारांनी सहभाग नोंदविला होता. या महोत्सवाच्या महाअंतिम फेरीचे यजमानपद यंदा बालरंगभूमी परिषद, अहिल्यानगर शाखेला मिळाले आहे.

नाट्य, नृत्य, संगीत, गायन आणि वादनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरुष व थोर विभूतींचे कार्य बालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि त्यांच्यात प्रेरणा निर्माण करणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती परिषद अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के-सामंत यांनी दिली.
स्पर्धा एकल (लहान गट), एकल (मोठा गट) आणि सांघिक गट अशा तीन विभागांत होणार असून, एकपात्री, नाट्यछटा, स्वगत, गाणी आणि नृत्य अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण बालकलाकार करणार आहेत.

महाअंतिम फेरीचे परीक्षण ख्यातनाम अभिनेते संजय हळदीकर, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि अभिनेते दिगंबर नाईक करणार आहेत. तसेच नाट्य व लोककला क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या बालकलाकारांच्या दर्जेदार सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी नगरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबईचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कार्यकारी मंडळ सदस्य अनंत जोशी, देवीप्रसाद सोहोनी तसेच अहिल्यानगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रसाद भणगे आणि शैलेश देशमुख यांनी केले आहे.
