बोल्हेगावच्या स्वामी समर्थ केंद्रात एकाच दिवशी २७ हजार स्वामी चरित्र पारायणांचा ऐतिहासिक उच्चांक
राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्रात नवा विक्रम ; हजारो भाविकांच्या भक्तिमय सहभागाने परिसर दुमदुमला
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरालगतच्या बोल्हेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्रात (दिंडोरी प्रणित) रविवारी (दि. २६ जुलै) आयोजित करण्यात आलेल्या भव्य धार्मिक सोहळ्यात एकाच दिवशी तब्बल २७ हजार स्वामी चरित्र पारायण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्रात एकाच दिवसात झालेल्या पारायणांचा हा उच्चांकी विक्रम मानला जात असून, या भक्तिमय सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर (काका) लोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकऱ्यांच्या समर्पित टीमने या भव्य उपक्रमाचे नियोजन केले होते. सकाळी सात वाजल्यापासूनच केंद्राकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. पारायणासाठी आलेल्या हजारो भाविकांसाठी भव्य मंडप, प्रशस्त आसनव्यवस्था तसेच मोठी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळी आठ वाजता सेवेकरी दाम्पत्याच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची आरती करून पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला. नियोजनबद्ध पद्धतीने तीन टप्प्यांत प्रत्येकी नऊ हजार, अशा एकूण २७ हजार पारायणांचे वाचन निश्चित वेळेत पूर्ण करण्यात आले.

स्वामी समर्थ केंद्राला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदा २५ हजार पारायणांचा संकल्प करण्यात आला होता. मात्र, भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा संकल्प ओलांडत २७ हजार पारायणांचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला.
या धार्मिक सोहळ्यात महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने पारायणात सहभाग नोंदविला. शाळकरी विद्यार्थ्यांसह तरुण-तरुणींनीही पारायण तसेच आयोजनाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. पारायण पूर्ण झाल्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सोहळ्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारो भाविकांनी उपस्थित राहून चंद्रशेखर (काका) लोळगे व त्यांच्या सेवेकरी परिवाराचे कौतुक केले. यावेळी बोलताना लोळगे यांनी, याच धर्तीवर आगामी काळात ‘दुर्गा सप्तशती’ ग्रंथाच्या १००८ पारायणांचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. भक्ती, शिस्त, उत्कृष्ट नियोजन आणि हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे बोल्हेगाव येथील हा सोहळा राज्यातील धार्मिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.

