बळीराजाच्या शिवारात हिरवाई नांदो – आमदार अमोल खताळ
राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठ्ठल चरणी प्रार्थना
संगमनेर | प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि समाजाच्या सुख-समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली. यंदा राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजाच्या शिवारात हिरवाई नांदावी, पिके जोमाने यावीत, प्रत्येक कुटुंब आनंदी, समाधानी आणि समृद्ध व्हावे तसेच सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली.
आषाढी एकादशीनिमित्त आमदार खताळ यांनी संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडवरील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच वाघापूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून राज्याच्या प्रगतीसह शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि सर्व समाजबांधवांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मंदिर परिसरात भाविकांनी उपस्थित राहून विठ्ठलनामाचा गजर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. आमदार खताळ यांनी भाविकांशी संवाद साधत सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले, “आषाढी एकादशी हा भक्ती, सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा अत्यंत पवित्र दिवस आहे. संतांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात बंधुभाव, सद्भावना आणि सेवाभाव अधिक दृढ व्हावा, हीच या दिवसाची खरी शिकवण आहे.”
ते पुढे म्हणाले, “यंदा राज्यात समाधानकारक पाऊस पडून बळीराजाच्या आशा पूर्ण व्हाव्यात, शेतकऱ्यांच्या शिवारात हिरवाई बहरावी, प्रत्येक कुटुंब सुखी, समाधानी आणि समृद्ध व्हावे तसेच सर्वांच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि भरभराट नांदावी, अशी प्रार्थना श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी केली आहे.”

