कान्होबा देवस्थानच्या जागेवरील हक्काबाबत निर्णय
उपविभागीय अधिकाऱ्यांचा देवस्थानच्या बाजूने निकाल; आमदार खताळ यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण
संगमनेर / प्रतिनिधी :
घुलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील श्री कान्होबा देवस्थानच्या जागेवरील हक्काबाबतचा बहुप्रतीक्षित निर्णय अखेर देवस्थानच्या बाजूने लागला आहे. संगमनेर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या या निर्णयानंतर संबंधित जागेवर श्री कान्होबा देवाच्या नावाचा नामफलक लावण्यात आला. या नामफलकाचे अनावरण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.
श्री कान्होबा देवस्थानच्या जागेवरील हक्काबाबत घुलेवाडी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करत होते. ग्रामस्थांच्या मागणीसंदर्भात आमदार खताळ यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी देवस्थानच्या बाजूने निर्णय दिल्याने ग्रामस्थांच्या मागणीला दिलासा मिळाला आहे.

नामफलकाच्या अनावरणावेळी विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणात प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचे, घुलेवाडी ग्रामस्थांचे तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलिस प्रशासनाचे ग्रामस्थांनी आभार मानले.
“श्री कान्होबा देवस्थान ही घुलेवाडी ग्रामस्थांच्या श्रद्धेची आणि आस्थेची जागा आहे. या जागेवरील हक्कासाठी ग्रामस्थांनी अनेक वर्षे संयमाने आणि कायदेशीर मार्गाने पाठपुरावा केला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी देवस्थानच्या बाजूने निर्णय दिला आहे. संबंधित उतारा श्री कान्होबा देवस्थानच्या नावावर असल्याने जागेच्या नोंदी व पिकाच्या नोंदीबाबतही त्यानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घ्यावी,” असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
