घुलेवाडीत कान्होबा देवस्थानच्या इनाम जमिनीचा ताबा गावकऱ्यांच्या हाती …

विनाकारण राजकीय लुडबुड नको – ग्रामस्थांची प्रतिक्रिया

संगमनेर प्रतिनिधी –

घुलेवाडी गावचे आराध्य दैवत कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज देवस्थान ट्रस्टच्या इनाम जमिनीचा वर्षानुवर्षांचा लढा अखेर गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे यशस्वी झाला आहे. गावकऱ्यांनी सातत्याने कायदेशीर मार्गाने दिलेल्या या लढ्याला यश मिळाले असून, या विजयाचे संपूर्ण श्रेय केवळ आणि केवळ ग्रामस्थांचेच आहे. त्यामुळे ज्यांचा या संघर्षाशी दुरान्वयेही संबंध नाही, अशा मंडळींनी श्रेयवादाचे सवंग राजकारण करू नये, असा रोखठोक इशारा भाविक आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

घुलेवाडी गावाला शेकडो वर्षांची नाथ संप्रदायाची थोर परंपरा आहे. कानिफनाथ महाराज देवस्थानच्या दिवाबत्ती आणि देखभालीसाठी ऐतिहासिक काळापासून इनाम जमीन देण्यात आलेली होती. मात्र, भूतकाळात पडलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे या जमिनीकडे काहीसे दुर्लक्ष झाले. याचाच गैरफायदा घेत एका कुटुंबाने या मौल्यवान जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा कुटिल प्रयत्न केला. कायदेशीर मार्गाने मालकी हक्क मिळत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर इतर मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न झाला; मात्र गावकऱ्यांच्या तीव्र श्रद्धेमुळे आणि जागरूकतेमुळे हा डाव सपशेल अपयशी ठरला.

सिताराम राऊत, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र ढमाले, उपाध्यक्ष व ‘छावा’ संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते संदीप गंगाधर राऊत, तसेच कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. संतोष लक्ष्मण राऊत यांनी अत्यंत मजबूत कायदेशीर बाजू मांडत हा लढा तडीस नेला. गावकऱ्यांच्या अभेद्य एकजुटीमुळेच देवस्थानची जागा पूर्ववत मिळवण्यात यश आले. अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभमुहूर्तावर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत या जागेवर अधिकृत ताबा मिळवला आणि पूजाअर्चा करून आपल्या धार्मिक अस्मितेचा ध्वज फडकवला.

नवीन लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणत्याही राजकीय नेत्यांचा या कायदेशीर लढ्यात काडीचाही संबंध नव्हता. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गावातील काही स्थानिक पुढाऱ्यांनी या धार्मिक विषयाला राजकीय रंग देत राजकीय नेत्यांना निमंत्रित केले. ज्यांचा या संघर्षात काडीचेही योगदान नाही, त्यांनी अशा कार्यक्रमांना येणेच योग्य नव्हते ! हा संपूर्ण गावाच्या एकोप्याचा आणि अस्मितेचा विजय आहे. धार्मिक कार्यात विनाकारण राजकारण आणून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ग्रामस्थ सहन करणार नाहीत, असे राजू खरात यांच्यासह अध्यक्ष मच्छिंद्र ढमाले व उपाध्यक्ष संदीप राऊत यांनी म्हटले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!