आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान : माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेरमध्ये राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात ; लोकशाही व राज्यघटना धोक्यात असल्याचा थोरात यांचा इशारा

संगमनेर प्रतिनिधी :
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध पहिला लढा उभारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात रामोशी समाजाने अत्यंत प्रामाणिकपणे व एकनिष्ठतेने काम केले. प्रामाणिक, एकनिष्ठ आणि लढवय्या अशी रामोशी समाजाची ओळख असून, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राजे उमाजी नाईक यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सायखिंडी फाटा व यशोधन कार्यालय मैदानावर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित २३५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

ब्रिटिशांविरुद्ध पहिला लढा उमाजी नाईक यांनी उभारला
बाळासाहेब थोरात म्हणाले की, ब्रिटिशांविरुद्ध पहिला लढा आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी उभारला. त्यानंतर १८५७ चे युद्ध झाले. पुढे लोकमान्य टिळक युग आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर मिळालेली राज्यघटना ही सर्वांसाठी मोठी देणगी असून, गोरगरिबांनाही मतदानाचा अधिकार मिळाला आहे. मात्र, सध्या लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात असून जाती-धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. धर्मा-धर्मांमध्ये फूट पाडली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेरची विकासाची परंपरा जपण्याचे आवाहन
संगमनेर तालुका सातत्याने झालेल्या विकासकामांमुळे राज्यात अग्रगण्य ठरला आहे. सहकार, शिक्षण, आर्थिक संपन्नता, ग्रामीण विकास आणि व्यापारासाठी असलेल्या चांगल्या वातावरणामुळे संगमनेरचा देशात लौकिक वाढला आहे. संगमनेर तालुक्यात राजकीय आदर्श संस्कृती असून, सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. तालुक्याचा विकास आणि एकजूट जपण्यासाठी सर्वांनी एकत्र राहावे, असे आवाहन थोरात यांनी केले.

फोडा-तोडा नीतीपासून सावध राहण्याचे आवाहन
देवराम गुळवे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका विकासातून पुढे नेला असून, सर्व समाजाला जपले आणि सर्वांना समान संधी दिली. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. मात्र, काही लोक आता ब्रिटिशांची फोडा-तोडा नीती वापरून समाजात भेद निर्माण करत आहेत. आपल्यासाठी कोण काम करते आहे, हे लक्षात घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
तानाजी शिरतार म्हणाले की, तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे. संगमनेर तालुक्यात कधीही भेदभावाचे राजकारण झाले नाही. मात्र, आता संगमनेरमध्ये अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. अशा प्रवृत्ती वेळीच रोखाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रोशन गोफणे आणि रमेश गफले यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, देवराम गुळवे, तानाजी शिरतार, खर्डे गुरुजी, रमेश गफले, सचिन गुळवे, सचिन बोऱ्हाडे, संजय चव्हाण, रोशन गोपने, श्रीराम पवार, प्रा. बाबा खरात, दिलीप जोशी, ज्ञानेश्वर राक्षे, साहेबराव गुळवे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शरद बोऱ्हाडे, विकास जेडगुले, सचिन जेडगुले, संतोष शिंदे, भाऊ गोफने, रोहिदास गुळवे, समीर चव्हाण, प्रवीण गोफणे, राम बिडवे, शुभम जेडगुले, रोशन गोफणे, अमित जेडगुले, निलेश जेडगुले, गोविंद गोफणे आदी उपस्थित होते.
सायखिंडी फाटा येथे यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. संगमनेरमधील कुस्तीप्रेमी महिला व नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सवात सहभाग घेतला.
