राज्यस्तरीय ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्रातील विद्यार्थी, कलावंत, महाविद्यालये व हौशी नाट्यसंस्थांना सहभागी होण्याचे आवाहन 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने ‘नाट्यकलेचा जागर’ या उपक्रमांतर्गत सलग तिसऱ्या वर्षी ‘नाट्य परिषद करंडक’ खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी, कलावंत, नाट्यकर्मी आणि हौशी नाट्यसंस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

तीन टप्प्यांत होणार स्पर्धा

‘नाट्य परिषद करंडक’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा प्राथमिक, विभागीय आणि अंतिम, अशा तीन टप्प्यांत होणार आहे.

प्राथमिक फेरी : सप्टेंबरअखेर महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर

विभागीय फेरी : प्राथमिक फेरीतून निवडलेल्या एकांकिकांची

अंतिम फेरी : २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा-माहीम येथे होणार आहे. 

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एकांकिका स्पर्धा घेण्याचा नाट्य परिषदेचा मानस असून, ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका प्राप्त होतील, त्या ठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक जिल्ह्यांतील कलावंतांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. 

गतवर्षी २५८ एकांकिकांचा सहभाग

गतवर्षी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ही स्पर्धा यशस्वीपणे घेण्यात आली होती. गतवर्षी तब्बल २५८ एकांकिका सादर झाल्या. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्री यांनी विविध ठिकाणी जाऊन या कलावंतांना मार्गदर्शन केले. 

गतवर्षीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेचे व्यावसायिक नाटकात रूपांतर करण्यात आले. या नाटकाचे आतापर्यंत १०० प्रयोग झाले असून, त्यापैकी २५ प्रयोग महाराष्ट्रातील नाट्य परिषदेच्या शाखांमध्ये सादर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. 

अंतिम फेरीतील विजेत्यांसाठी भरीव रोख पारितोषिके

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी विविध विभागांत रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

एकांकिका स्पर्धा :

सर्वोत्कृष्ट – ₹१,००,०००, उत्कृष्ट – ₹७५,०००, उत्तम – ₹५०,०००, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी ₹१५,०००, लेखन/दिग्दर्शन वैयक्तिक पारितोषिके : ₹११,०००, ₹७,०००, ₹५,०००

स्त्री अभिनय/पुरुष अभिनय : ₹७,०००, ₹५,०००, ₹३,०००, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा व वेशभूषा : ₹५,०००, ₹३,०००, ₹२,००० अशी वैयक्तिक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. 

अंतिम फेरीतील कलावंतांसाठी विशेष नाट्य कार्यशाळा

अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कलावंतांसाठी विशेष नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्री या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे अंतिम फेरीतील एकांकिकांचे सादरीकरण अधिक दर्जेदार करण्यावर भर दिला जाणार आहे. 

नाट्य परिषदेच्या माध्यमातून उत्कृष्ट एकांकिकांना पुढे व्यावसायिक रंगभूमीवर सादरीकरणाची संधी मिळावी, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. 

‘नाट्यकलेचा जागर’अंतर्गत अन्य स्पर्धांचाही मानस

१०० व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ या उपक्रमांतर्गत एकपात्री स्पर्धा, नाट्यअभिवाचन स्पर्धा तसेच नाट्यसंगीत पदगायन प्रवेश स्पर्धा यांचाही स्पर्धा महोत्सव घेण्याचा नाट्य परिषदेचा मानस असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन ; १८ सप्टेंबर अंतिम मुदत

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी ₹१,००० ठेवण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून स्पर्धेची माहिती व नियमावली नाट्य परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख : १८ सप्टेंबर २०२६ आहे. 

अहिल्यानगर केंद्रासाठी संपर्क

अहिल्यानगर केंद्रासाठी इच्छुक स्पर्धकांनी समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनंत जोशी – ९४२२२२६३६३, प्रशांत जठार – अहिल्यानगर केंद्रासाठी संपर्क

अधिक माहितीसाठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई यांच्याशी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

विद्यार्थी व नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनाही संधी

या स्पर्धेत विद्यार्थी, कलावंत, महाविद्यालये, हौशी नाट्यसंस्था, विद्यापीठे तसेच महाविद्यालयांच्या नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषद मध्यवर्ती, मुंबईचे पदाधिकारी आणि अहिल्यानगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

महाराष्ट्रातील नवोदित व गुणवान कलावंतांना राज्यस्तरावर आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे आणि उत्कृष्ट एकांकिकांना व्यावसायिक रंगभूमीपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे पत्रकावरून स्पष्ट होते. 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!