विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची विशेष तपासणी — ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क : 

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने श्रीरामपूर शहर पोलिस, शिर्डी वाहतूक शाखा आणि श्रीरामपूर आरटीओ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस तसेच इतर वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ६६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीरामपूर पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

सुरक्षिततेच्या विविध बाबींची तपासणी

तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची फिटनेस, परवाना, विमा, परमिट, प्रदूषण प्रमाणपत्र यांसह वाहन चालविण्याचा चालकाचा परवाना तपासण्यात आला. याशिवाय वाहनांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली साधने उपलब्ध आहेत की नाही, याचीही पाहणी करण्यात आली. 

३३ वाहनांवर विविध कारणांनी दंडात्मक कारवाई

विशेष तपासणी मोहिमेदरम्यान एकूण ६६ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३३ वाहनांमध्ये नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये २ वाहनचालकांकडे लायसन्स आढळून आले नाही, तर १ वाहनाकडे पीयूसी प्रमाणपत्र नव्हते. तसेच ६ चालक युनिफॉर्ममध्ये नसल्याचे आढळले. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६ वाहनांवरही कारवाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली अग्निशामक यंत्रणा नसलेल्या ६ वाहनांवर, तर प्रथमोपचार पेटी नसलेल्या ५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय २ वाहनांमध्ये फिटनेससंबंधी त्रुटी, ३ वाहनांमध्ये इमर्जन्सी एक्झिट सुस्थितीत नसणे, तर २ वाहनांमध्ये सेफ्टी काचा व जाळीबाबत त्रुटी आढळून आल्या.

अशाप्रकारे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीत एकूण ३३ वाहनांवर विविध नियमभंगांप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरातील ही अशा प्रकारची प्रथमच विशेष ड्राइव्ह असल्याने काही वाहनचालकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत समज देऊन सोडण्यात आले. मात्र, यापुढे अधिक कडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही केवळ स्कूल बस चालकांची जबाबदारी नसून वाहन चालक, वाहन मालक, शाळा प्रशासन आणि पालक यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भातील सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!