आमदार खताळांच्या आदेशाला केराची टोपली ; ‘महावितरण’चा मनमानी कारभार सुरूच, नागरिक त्रस्त !
संगमनेर प्रतिनिधी –
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी वीज वितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत कडक सूचना दिल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी या सूचनांना थेट केराची टोपली दाखवल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. लोकप्रतिनिधींनी आदेश देऊनही महावितरणच्या भोगस आणि ढिसाळ कारभारात तीळमात्र फरक पडलेला नाही.
दर शनिवारी मेंटेनन्सच्या नावाखाली ‘बत्ती गुल’…
दर शनिवारी मेंटेनन्स आणि दुरुस्तीच्या नावाखाली तासनतास वीज पुरवठा खंडित केला जातो. विविध उपकेंद्रांमध्ये कामे सुरु असल्याचा दावा केला जातो. मात्र, शनिवार संपून नवीन आठवडा सुरू झाला की दररोज वीज जाण्याचे सत्र पुन्हा सुरूच राहते. जर दर शनिवारी दुरुस्ती केली जाते, तर आठवडाभर रोज लाईट का जाते ? महावितरण शनिवारी नक्की कसले मेंटेनन्स करते, हा आता मोठा संशोधनाचा विषय बनला आहे.

मार्केट यार्ड आणि वॉटर वर्क्स परिसरात नेहमीच वीज पुरवठ्याची बोंबाबोंब
मार्केट यार्ड आणि वॉटर वर्क्स फिडर अंतर्गत येणाऱ्या भागात दिवसातून किमान ४ ते ५ वेळा वीज घालवली जात आहे. सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड, विजेचा लपंडाव आणि कमी-अधिक दाबाने होणारा पुरवठा (व्होल्टेज फ्लक्चुएशन) यामुळे नागरिकांच्या घरातील आणि व्यापाऱ्यांच्या दुकानातील महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होत असल्याचे नागरिक सांगतात. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
तक्रार निवारण नंबर ‘नॉट रीचेबल’ ; संपर्क करायचा तरी कोणाशी ?
महावितरणने ग्राहकांसाठी जारी केलेला तक्रार निवारण दूरध्वनी क्रमांक कायम बंद असतो किंवा कॉल उचललाच जात नाही. वीज गेल्यावर किंवा आपत्कालीन परिस्थितीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांना कोणताच प्रतिसाद मिळत नाही असा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जातो तशाप्रकारे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून देखील सत्य बाब उघडकीस आणलेली आहे.

बिल वसुलीसाठी कायद्याचा बडगा, मग सेवेचे काय ?
थकीत वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांना तत्काळ वीज कापण्याच्या नोटिसा पाठवल्या जातात आणि कायद्याचा बडगा दाखवला जातो. मात्र, पै अन् पै वसूल करूनही ग्राहकांना अखंडित वीज देणे महावितरणला का जमू नये ?
आमदारांचे आदेश असोत किंवा सामान्य नागरिकांचे हाल, महावितरणला कसलेही सोयरसुतक उरलेले नाही. “आम्ही आमच्या मनाप्रमाणेच कारभार करणार” असाच आव अधिकारी आणत आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर वीज वितरणच्या या कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड तीव्र संताप पसरला असून, आता या बेजबाबदार अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय महावितरण वोघावर येणार नाही, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
