पुणे – नाशिक रेल्वे… पोपट मेलाय !

२५ दिवस संपले ; प्रश्न फक्त समितीचा नाही, सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे : अमोल शेलकर

संगमनेर प्रतिनिधी : 

राजकारणाचा खेळ, रेल्वे मार्गाची पळवा पळवी, एकमेकांवरच्या कुरघोड्या, आमदारकी पणाला लावण्याचे बोल बच्चन, नेत्यांचे आंदोलन, स्टंटबाजी, प्रसिद्धी आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी केलेली आंदोलने या सर्व खेळात पुणे – नाशिक सरळ मार्गे रेल्वे प्रकल्पाचा ‘राजकीय पोपट मेलाय…

या मार्गासाठी नेमण्यात आलेल्या समितीबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून या मार्गाचे नेमके काय झाले याबाबत आता सगळीकडून गुळणी धरण्यात आली आहे. दिखाव्यासाठी संगमनेर मुंबई दिल्ली चकरा मारून फोटोसेशन करणारे देखील आता थंडावले आहेत.

दरम्यान, पुणे–नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–संगमनेर–सिन्नर–नाशिक असाच कायम ठेवावा, अशी मागणी संगमनेर काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केली आहे.

GMRT चे संरक्षण आणि पुणे–नाशिक रेल्वेचा विकास हे दोन्ही एकत्र साध्य होऊ शकतात. त्यामुळे ‘GMRT की रेल्वे?’ असा प्रश्न नसून, ‘GMRT ला धक्का न लावता रेल्वेचा मूळ मार्ग कसा कायम ठेवता येईल?’ याचा शोध घेण्याची गरज असल्याचे शेलकर यांनी म्हटले आहे.

GMRT संदर्भातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास करून पर्याय सुचवण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून तिला ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र २५ दिवस उलटूनही समितीने प्रत्यक्ष पाहणी, जनसुनावणी आणि ग्रामसभांना सुरुवात केली आहे का? असा सवाल शेलकर यांनी उपस्थित केला.

संगमनेर, सिन्नर, नारायणगाव, मंचर व चाकण परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांशी समितीने थेट संवाद साधावा, तांत्रिक पर्याय तपासावेत आणि ६० दिवसांच्या मुदतीत पारदर्शक अहवाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

“रेल्वेही हवी आणि GMRT देखील हवे. वैज्ञानिक प्रगतीसोबत संगमनेरचा विकासही झाला पाहिजे. २५ दिवस संपले आहेत; उरलेले ३५ दिवस वाया जाऊ नयेत,” असे शेलकर यांनी स्पष्ट केले.

सरकारने आंदोलनावेळी दिलेले लेखी आश्वासन जनतेसमोर आणावे, अशी मागणीही त्यांनी केली. “६० दिवसांची मुदत जनतेला गप्प करण्यासाठी नाही, तर न्याय देण्यासाठी आहे,” असे सांगत समिती तातडीने जमिनीवर उतरली नाही तर सरकारच्या इच्छाशक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असा इशाराही शेलकर यांनी दिला.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!