वीज उपकेंद्रासाठी नगरपरिषदेने एका महिन्यात जागा उपलब्ध करून द्यावी
आमदार अमोल खताळ यांची नगरपालिका प्रशासनाला सूचना
संगमनेर प्रतिनिधी :
संगमनेर शहरातील वीजसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने महावितरण कंपनीला एका महिन्याच्या आत जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी नगरपरिषद प्रशासनाला केल्या आहेत. अशी माहिती प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.
संगमनेर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत वाढत असलेली विजेची मागणी लक्षात घेता अनेक भागांमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे तसेच वाढत्या वीजभारामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

कोल्हेवाडी रोडवरील जलकुंभाशेजारी नगरपरिषदेच्या मालकीची सुमारे ९.५ गुंठे जागा ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी महावितरण कंपनीने मागितली होती. त्यानुसार संगमनेर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने ठराव करून रेडी रेकनर दरानुसार सदर जागा भाडेतत्त्वावर महावितरणला देण्यास मान्यता दिली होती.
मात्र, सदर जागा रहिवासी भागातील खुली जागा (ओपन स्पेस) असल्याने तिची विक्री करता येणार नसल्याचे तसेच ती भाडेतत्त्वावर देण्याबाबत काही प्रशासकीय अडचणी असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून कळविण्यात आले. त्यामुळे विद्युत उपकेंद्र उभारणीचा विषय पुन्हा प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान, आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत नुकतीच बैठक झाली. जागा उपलब्ध झाल्यास संगमनेर शहरातील कमी दाबाचा वीजपुरवठा आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्या कमी होऊन त्या कायमस्वरूपी दूर करण्यास मदत होईल. जागा उपलब्ध होताच ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, असे कार्यकारी अभियंत्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वी घेतलेल्या ठरावाचा विचार करून तसेच संगमनेर शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेता, कोल्हेवाडी रोडवरील जलकुंभाशेजारील सुमारे ९.५ गुंठे जागा योग्य त्या अटी व शर्तींच्या अधीन राहून महावितरण कंपनीला भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. तसेच ही जागा एका महिन्याच्या आत उपलब्ध करून द्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी नगरपरिषद प्रशासनाला केल्या आहेत.
