कोठे मलकापूर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन देण्याचा करारनामा रद्द करा — आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुख्यमंत्र्यांचे तात्काळ कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
संगमनेर प्रतिनिधी —
मौजे कोठे मलकापूर, ता. संगमनेर येथील सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.०३ हेक्टर शासकीय जमीन एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रासाठी हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात यावी, तसेच सदर जमीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी देण्यासंदर्भातील करण्यात आलेल्या करारनामा रद्द करण्याबाबत संबंधित विभागास आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
पत्रामध्ये “मौजे कोठे मलकापूर, ता. संगमनेर येथील सरकारी गट नं. १६२ मधील १०.०३ हे. शासकीय जमीन एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रासाठी हस्तांतरित करण्याबाबत” असा विषय नमूद करण्यात आला आहे.

या मागणीसंदर्भात आमदार खताळ यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, अहिल्यानगर, तहसीलदार, संगमनेर, ग्रामपंचायत, कोठे मलकापूर यांचे पत्र तसेच अपर जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांचा आदेश असा संदर्भ दिला आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, मौजे कोठे मलकापूर, ता. संगमनेर येथील एकूण २२९.५३ हेक्टर क्षेत्र एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रासाठी प्रस्तावित असून, त्यामध्ये सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.०३ हेक्टर शासकीय जमीन समाविष्ट आहे.
सदर शासकीय जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महावितरण कंपनीस भाडेतत्त्वावर देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली होती. तथापि, सन २०२४ पासून सदर क्षेत्र एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रासाठी विकसित करण्याची कार्यवाही सुरू असूनही, सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भात सन २०२६ पर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असे आमदार खताळ यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, सदर जमीन एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रासाठी प्रस्तावित असल्याची बाब विचारात न घेता तसेच स्थानिक ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता करारनामा करण्यात आलेला आहे. यासंबंधी ग्रामसभेने सौर ऊर्जा प्रकल्पास नामंजुरी दर्शविली आहे. तेसेच तहसीलदार, संगमनेर यांनी सदर क्षेत्र एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रासाठी प्रस्तावित असल्याने ते सौर ऊर्जा प्रकल्पासाठी देणे उचित होणार नसल्याचे स्पष्टपणे कळविले आहे.
आमदार खताळ यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, संगमनेर तालुक्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सदर १०.०३ हेक्टर शासकीय जमीन एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रासाठी हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात यावी. तसेच सदर जमीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी देण्यासंदर्भातील करण्यात आलेला करारनामा रद्द करण्याबाबत संबंधित विभागास आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
संगमनेर तालुक्यात औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आणि नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी शासकीय जमिनीचा उपयोग एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रासाठी होणे आवश्यक असल्याचे या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोठे मलकापूर येथील १०.०३ हेक्टर शासकीय जमीन एमआयडीसीसाठी हस्तांतरित करण्याच्या मागणीवर आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर संबंधित विभागाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
