जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देणार — पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
जिल्ह्यात नवीन उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी शासनाकडून पुढाकार घेतला जात असून, या उद्योगांना आवश्यक सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक दीपक शिवदास, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, जिल्हा उद्योग अधिकारी अशोक बेनके यांच्यासह उद्योजक अरविंद पाडगावकर, प्रकाश भामरे, बाबासाहेब काळे, गिरधर आसणे, अद्विक ग्रुपचे श्री. मायकल यांच्यासह अन्य उद्योजक उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यात गुंतवणूक वाढवून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. उद्योजकांना उद्योगांसाठी आवश्यक जमीन तसेच रस्ते, पाणी, वीज आणि इतर औद्योगिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन व उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
शिर्डी, सुपा, घोडेगाव, अहिल्यानगर आणि श्रीरामपूर या औद्योगिक क्षेत्रांमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीमुळे उद्योगांसाठी अहिल्यानगर जिल्हा हा एक नवा पर्याय म्हणून पुढे येत आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी एमआयडीसीच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि उद्योगांना पोषक असे सुरक्षित व सुविधापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिर्डी विमानतळाचा विस्तार, छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीनफिल्ड कॉरिडोर, संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक तसेच कृषी आधारित उत्पादन, लघुउद्योग आणि सूक्ष्म व लघु उद्योगांच्या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. गुंतवणुकीच्या करारांमध्ये तरुण उद्योजक आणि महिला उद्योजक पुढे येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने यांनी जिल्ह्यात १३ हजार १७३ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले असून, त्यातून ११ हजार ९४८ तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ८३ कंपन्यांनी गुंतवणूक करार केल्याची माहिती दिली. यामध्ये १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक संरक्षण क्षेत्रातील असल्याचे त्यांनी सांगितले.
‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमांतर्गत साखर आणि दूध उत्पादनाच्या क्षेत्रातही तरुण उद्योजकांनी गुंतवणूक केली आहे. तसेच मैत्री २.० या पोर्टलअंतर्गत सूक्ष्म व लघुउद्योजकांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात असून, विविध प्रकारच्या परवानग्यांसाठी एकाच छताखाली १७६ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधेचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी उद्योजक अरविंद पाडगावकर तसेच अद्विक ग्रुपचे मायकल यांनी मनोगत व्यक्त केले.

