रात्रीच्या ३ तासांच्या लोडशेडिंगमुळे बिबट्याची दहशत ; राजापुरात बॅनरबाजी, आमदारांकडे मदतीची हाक
संगमनेरमधील ‘महावितरण’चा छळवाद ! काळे झेंडे दाखवण्याचा आणि घरोघरी लावण्याचा इशारा !!
संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर वीज वितरण कंपनीचा (महावितरण) कारभार पूर्णपणे वेशीवर टांगला गेला असून, त्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात विनाकारण वीज गायब करण्याचे प्रकार सलग सुरू असून, आता याचा फटका संगमनेर जवळील राजापूर गावाला बसत आहे. दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या ऐन गरजेच्या काळातच वीज घालवली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
महावितरणच्या या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी राजापूर ग्रामपंचायतीजवळ नागरिकांनी आक्रमक फलक (बॅनर) लावून वीज मंडळाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. “ऐन सायंकाळी लोडशेडिंग करून आमच्या मुलाबाळांचे बिबट्यापासून संरक्षण कोण करणार ?” असा सवाल या फलकांच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.

बिबट्याची दहशत अन् महावितरणचा निष्काळजीपणा !
राजापूर लगतच्या जवळे कडलग येथे दोन दिवसापूर्वी बिबट्याच्या भीतीने पळताना एका ११ वर्षांच्या बालकाचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची ताजी घटना घडली आहे. असे असतानाही महावितरणला जाग आलेली नाही. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याचा हल्ला वाढण्याची दाट शक्यता असतानाही ३-३ तास वीज गायब केली जात आहे.
स्वयंपाक अन् अभ्यासाच्या वेळीच ‘अंधार’
सायंकाळी ६ ते ९ ही वेळ लहान मुलांच्या अभ्यासाची आणि महिलांच्या स्वयंपाकाची असते. याच महत्त्वाच्या वेळी वीज घालवून महावितरण नेमका कोणता सूड उगवत आहे, असा संतप्त सवाल महिला वर्ग विचारत आहे. कुठलीही तांत्रिक अडचण नसताना दररोज लाईट घालवण्यामागे नक्की काय षडयंत्र आहे, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणून रात्रीचे हे जीवघेणे लोडशेडिंग तात्काळ बंद करण्यासाठी आमदारांनी आक्रमक पाऊल उचलावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. रस्त्यावरील हे फलक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांना आता तरी जाग येणार की कुणाचा बळी गेल्यावरच प्रशासन हलणार, असा आक्रमक सवाल राजापूरकर विचारत आहेत.

काळे झेंडे दाखवण्याचा आणि घरोघरी लावण्याचा इशारा !
राजापूरमधील ३०० हून अधिक घरे दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत अंधारात ढकलली जात आहेत. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, हे जीवघेणे लोडशेडिंग तात्काळ बंद न झाल्यास गावात येणाऱ्या-जाणाऱ्या सरकारमधील लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जाईल. तसेच, जवळे रोड, घोलप फाटा आणि चिकणी रोड या प्रमुख भागांतील प्रत्येक घरावर काळे झेंडे लावून महावितरणविरोधात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
