कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १४ गोवंशीय जनावरांची सुटका ; संगमनेरमध्ये LCB ची कारवाई
संगमनेर प्रतिनिधी –
कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १४ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सुटका केली. ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरण गावच्या शिवारात करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर शहर परिसरात अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना कुरण येथील जमील शेख यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तसेच मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता १४ लहान-मोठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे १ लाख रुपये किमतीची १४ गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली. या प्रकरणात जमील उर्फ जमालुद्दीन शेख, अशपाक राजू शेख, तनवीर मुन्ना पठाण तसेच आदिल शेख व सलमान शेख (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान संबंधित आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८५९/२०२६ नुसार महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) मधील कलम ५(अ), ५(ब), ५(क), ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याबाबतच्या कलम ३ व ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनील मालणकर व महादेव भांड यांच्या पथकाने केली.
