तीन वर्षांपासून तपासावर असलेला गुन्हा उघड ; अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध

अहिल्यानगर पोलिसांच्या AHTU पथकाची कारवाई ; आरोपी मुंबईतून ताब्यात

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 

तब्बल तीन वर्षांपासून तपासावर असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्याचा छडा लावत अहिल्यानगर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) महत्त्वाची कारवाई केली आहे. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला मुंबई परिसरातून ताब्यात घेतले असून, अपहृत मुलीचाही शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी व मुलीला पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२४ रोजी करण अशोक दाहिजे (वय २२, रा. गावडेमळा, अहिल्यानगर) याने एका अल्पवयीन मुलीला पद्मानगर, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर येथून फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४६/२०२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पुढे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU), अहिल्यानगर येथे वर्ग करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हमीद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला वेग

गुन्ह्याचा तपास सुरू असताना AHTU पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळविण्यासोबतच तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आला. या तपासादरम्यान आरोपी करण अशोक दाहिजे हा कांदिवली, पश्चिम मुंबई परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक हमीद शेख यांनी पथकासह कारवाईची तयारी केली. पोलीस अधीक्षकांची परवानगी घेऊन १० सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाले.

मुंबई परिसरात तपास करून पोलिसांनी आरोपी करण अशोक दाहिजे याला ताब्यात घेतले. त्याचबरोबर अपहृत अल्पवयीन मुलीचाही शोध घेण्यात आला. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी आणि अपहृत मुलीला पुढील तपासकामी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक गणेश उगले, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक हमीद शेख, सफौ/शकील शेख, पोहेकॉ/समीर सय्यद, पोहेकॉ/अर्चना काळे, पोहेकॉ/अनिता पवार, मपोहेकॉ/छाया रांधवण, चालक मपोहेकॉ/अमरूण संगळे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. 

तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आरोपीपर्यंत पोहोचण्यात AHTU पथकाला यश आल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!