बेकायदेशीर भंगार दुकानांवर मोठी कारवाई !
विनापरवाना वाहने तोडणाऱ्या भंगार दुकानदारांवर गुन्हे दाखल ; दोघांना अटक
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
शहरातील बेकायदेशीर भंगार व्यवसायावर श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना वाहने तोडून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या तीन भंगार दुकानदारांची चौकशी केली. याप्रकरणी दोन भंगार दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून, तिसऱ्या दुकानदाराकडून समाधानकारक खुलासा मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर भंगार दुकानांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान गोपीनाथनगर परिसरातील भंगार दुकानांची बारकाईने पाहणी करण्यात आली.

तपासणीत शकील इब्राहिम शहा (वय ४८) याच्या भंगार दुकानात विविध प्रकारची १० वाहने, सुलेमान दादामिया शहा (वय ४५) याच्या दुकानात ४ वाहने, तर आसिफ हारुण शहा (वय ४०) याच्या दुकानात ३ वाहने आढळून आली. अशा प्रकारे एकूण १७ वाहने तपासणीच्या कक्षेत आली.
या वाहनांच्या मालकीबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच वाहने चोरीची असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वाहनांच्या कागदपत्रांची व मालकी हक्काची चौकशी केली. वाहनांची तोडफोड करून त्यांना स्क्रॅप करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची (RTO) परवानगी घेण्यात आली नसल्याचेही तपासात आढळले.
याशिवाय वाहनांचे चेसिस व इंजिन क्रमांक संबंधित विभागाकडे जमा न करता तसेच शासनाचा कर न भरता वाहने मोडीत काढण्याचा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी शकील इब्राहिम शहा व सुलेमान दादामिया शहा यांच्याविरुद्ध दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८७/२०२६ नोंद करण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील कलम २२३, ३१८(४) व ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, तिसरा भंगार दुकानदार आसिफ हारुण शहा याच्याकडून वाहनांबाबत समाधानकारक खुलासा व माहिती प्राप्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी भंगार दुकानदार आणि गॅरेज चालक-मालकांना वाहन खरेदी-विक्रीबाबत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुकानात येणाऱ्या प्रत्येक जुन्या वाहनाची आरसी बुक, इंजिन व चेसिस क्रमांक तसेच सुट्या भागांची अचूक नोंद रजिस्टरमध्ये ठेवावी, असा निर्देश देण्यात आला आहे.
वाहन खरेदी करताना संबंधित मालकाकडून आवश्यक कागदपत्रे व आधार घेणे, RTOच्या अधिकृत परवानगीशिवाय कोणतेही वाहन स्क्रॅप न करणे आणि संशयास्पद, विनानंबर अथवा अत्यल्प किमतीत विक्रीस आलेल्या वाहनाची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, रामचंद्र शिखरे, रोशन निकम, तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
