समृद्धी महामार्गावरील दरोडा उघड !

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चार सराईत आरोपी ताब्यात

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

समृद्धी महामार्गावर वाहन दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिक व त्याच्या साथीदारांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लुटल्याचा दरोडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत उघडकीस आणला. या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹१ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार आहेत.

दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १.१५ वाजता समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक ५०८ येथे अभिषेक मच्छिंद्र गायकवाड (वय २०, रा. पिंपळवाड रोड, साकुरी, ता. राहाता) हे आयशर कंपनीचे वाहन दुरुस्त करत होते. त्यावेळी सहा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यासह साक्षीदारांना चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले.

या घटनेप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२), ११५(२), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरोड्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेने तपासासाठी चार पथके तयार केली. पथकांनी घटनास्थळाची पाहणी करून गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळविण्यासह तांत्रिक विश्लेषण केले. तसेच समृद्धी महामार्गावरील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. चार दिवसांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर पोलिसांना दरोड्यातील आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.

दि. ११ सप्टेंबर रोजी मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलिसांनी कोपरगाव-शिर्डी रोडवरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ, कोकमठाण गावाच्या शिवारात सापळा रचला. यावेळी मोटारसायकलसह बसलेल्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये धनंजय उर्फ धनु प्रकाश काळे (२७), स्वप्नील संतोष भारूड (२०), प्रशांत जालींदर भारूड (२०) आणि शिवरंजन राजेश शिंदे (२२) यांचा समावेश आहे. हे सर्व कोपरगाव परिसरातील रहिवासी आहेत.

आरोपींकडे चौकशी केली असता, धनंजय उर्फ धनु काळे याने आपल्या साथीदारांसह दरोडा केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. त्याच्यासोबत चंदू नारायण तहकीक (रा. सावळीविहीर, ता. राहाता) तसेच नाव-पत्ता माहीत नसलेला त्याचा आणखी एक साथीदार सहभागी असल्याचे समोर आले आहे. हे दोघे सध्या फरार आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेले दोन मोबाईल, ₹२ हजार रोख आणि सुमारे ८० हजार किमतीची हिरो प्लेंडर मोटारसायकल (एमएच-१७-डीपी-३२१३) असा एकूण १ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या धनंजय उर्फ धनु काळे आणि स्वप्नील भारूड या दोघांवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

धनु काळे याच्यावर कोपरगाव शहर, लोणी, कोपरगाव तालुका आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी, चोरीची तयारी, घरफोडी आदी स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर स्वप्नील भारूड याच्यावर कोपरगाव शहर, संगमनेर तालुका, श्रीरामपूर शहर, घारगाव आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यांत विविध कलमांनुसार सहा गुन्हे दाखल आहेत.

ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!