कर्णकर्कश आवाजात साउंड सिस्टीम वाजवणे भोवले ; मंडळाच्या अध्यक्षासह साउंड सिस्टीम मालकावर गुन्हा
साउंड सिस्टीम जप्त, मालकाला १५ हजारांचा दंड
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कर्णकर्कश आवाजात साउंड सिस्टीम वाजवणे शिवराजे युवा मित्र मंडळाच्या अध्यक्षासह साउंड सिस्टीम मालकाला चांगलेच भोवले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संबंधित साउंड सिस्टीम जप्त करण्यात आली आहे.
दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ३, बालिका विद्यालयाजवळील शिवसर्कल चौक येथे आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीत हा प्रकार घडला.

पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून शिवराजे युवा मित्र मंडळाचे अल्पवयीन अध्यक्ष अ.ब.क. आणि शिवाजा साउंड सिस्टीमचे मालक निलेश दादू पाटील यांनी साउंड सिस्टीमचा मोठ्या आवाजात वापर केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
परिसरात ध्वनीप्रदूषण ; पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
आरोपींनी टाटा एस ट्रक क्रमांक MH 46 AF 6580 वर साउंड सिस्टीम लावून अत्यंत कर्णकर्कश आवाजात गाणी लावली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
मिरवणुकीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांनी वेळोवेळी आवाज कमी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

BNS सह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 893/2026 दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223, 270, 292 सह मोटार वाहन कायद्यातील कलम 182 A/19(4) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तसेच सदर साउंड सिस्टीम जप्त करण्यात आली असून, आरटीओ श्रीरामपूर यांच्या मार्फत साउंड सिस्टीमच्या मालकाला १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक विशाल चंद्रकांत खैरे यांच्याकडील API रामचंद्र शिखरे, PSI आप्पासाहेब हंडाळ, सफौ. दिपक कदम, पो.कॉ./मच्छिंद्र कातखडे, पो.कॉ./अजित पटोरे, पो.कॉ./पंकज सानप, पो.कॉ./ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी कारवाई केली. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पो.कॉ./पांडुरंग चौधरी करीत आहेत.

