आषाढी एकादशी निमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयात शुक्रवारी ‘अभंगवारी’

संगमनेर | प्रतिनिधी

आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने ‘अवघा रंग एक झाला’ या अभंग व भक्तीगीतांच्या सांस्कृतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सह्याद्री महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहात हा भक्तिरसाने नटलेला कार्यक्रम संपन्न होणार आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आषाढी वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संतांच्या अभंगांचा गजर, विठ्ठलनामाचा अखंड जयघोष आणि भक्तीचा ओलावा यामुळे आषाढी एकादशीचा उत्सव प्रत्येकाच्या मनात विशेष स्थान राखून आहे. या समृद्ध वारकरी परंपरेचा अनुभव रसिकांना देण्यासाठी संगीत महाविद्यालयाने अभंग आणि भक्तीगीतांची ही विशेष मैफल आयोजित केली आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, कांचनताई थोरात** यांच्यासह संगमनेर परिसरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात ह.भ.प. विनोद राऊत व स्वप्नाली राऊत तसेच त्यांच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांकडून संतांच्या अभंगांचे आणि भक्तीगीतांचे सादरीकरण होणार आहे. या सादरीकरणाला सत्यजित सराफ, गणेश गोरडे, सौरभ रणधीर, वैभव पवार, अवधूत काळे आणि नानासाहेब गुंजाळ हे संगीत साथ देणार आहेत. तर संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विठ्ठल शेवाळे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा, संतवाङ्मयाची समृद्ध परंपरा आणि अभंगांच्या माध्यमातून विठ्ठलभक्तीचा संदेश अनुभवण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील भाविक, युवक, नागरिक आणि संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ आणि प्रा. विनोद राऊत यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!