बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात रविवारी २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर येथील स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे रविवारी (ता. २६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक श्री स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमात आबालवृद्धांसह सर्व वयोगटातील भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांनी केले आहे.
सुमारे २५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या सेवा केंद्राने आज परिसरातील प्रमुख आध्यात्मिक केंद्र म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रारंभी परिसरात विरळ वस्ती असल्याने भाविकांची संख्या मर्यादित होती. मात्र, स्वामी समर्थांच्या सेवेतून अनेकांना मानसिक आधार, सकारात्मक दिशा आणि जीवनात नवी प्रेरणा मिळाल्याने भाविकांचा ओघ सातत्याने वाढत गेला.

विशेषतः व्यसनाधीनता, नैराश्य आणि भरकटलेल्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी अनेक युवकांनी स्वामींच्या विचारांचा स्वीकार करून उद्योग-व्यवसाय, नोकरी आणि समाजोपयोगी कार्यात यश मिळविल्याचे अनुभव या केंद्राशी जोडले गेले आहेत.
केंद्रातील बाल संस्कार विभागासह एकूण १८ विविध विभागांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक संस्कारांचे कार्य प्रभावीपणे राबविले जात आहे. त्यामुळे आज या केंद्रात सर्व स्तरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. बोल्हेगाव परिसराच्या वाढत्या नागरी विस्तारामुळे तसेच जिल्हा व परजिल्ह्यातूनही अनेक भाविक येथे नियमित दर्शन व सेवेसाठी येत असतात. विशेषतः गुरुवार आणि रविवार या दिवशी येथे मोठी गर्दी होत असते.

या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या २५ हजार भाविकांच्या सामूहिक श्री स्वामी चरित्र पारायण सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, अधिकाधिक भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन स्वामींचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन चंद्रशेखर काका लोळगे यांनी केले आहे.
