संगमनेरवरील सर्व विघ्ने दूर करा ; बळीराजाला सुख-समृद्धी लाभू दे — आमदार अमोल खताळ
संगमनेर | प्रतिनिधी
“विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने संगमनेरवरील सर्व विघ्ने दूर होवोत, तालुक्यात भरपूर पाऊस पडो, बळीराजा सुखी-समाधानी राहो आणि सर्व नागरिकांना सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो,” अशी भावपूर्ण प्रार्थना आमदार अमोल खताळ यांनी श्री गणेशाच्या चरणी अर्पण करत संगमनेरात दाखल झालेल्या भव्य १४ फुटी गणेशमूर्तीचे विधिवत स्वागत केले.
मुंबईतील लालबाग-परळ येथून संगमनेरसाठी रवाना झालेल्या या भव्य गणेशमूर्तीच्या आगमनाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेशमूर्तींपैकी एक असलेल्या या मूर्तीच्या स्वागताचा मान यंदा प्रथमच संगमनेरकरांना लाभल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

विघ्नहर्ता गणेश तरुण मित्रमंडळाने अनेक वर्षांपासून जपलेले स्वप्न यंदा प्रत्यक्षात उतरले. मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार तथा संगमनेरचे जावई प्रथमेश घाडगे यांनी ही आकर्षक १४ फुटी गणेशमूर्ती साकारली आहे. रविवारी दुपारी विशेष कंटेनरमधून लालबाग-परळ येथून मूर्ती संगमनेरकडे रवाना झाली. यावेळी मुंबईतील गणेशभक्तांनी “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात गणरायाचे स्वागत केले.
मुंबई–ठाणे मार्गे समृद्धी महामार्ग व पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत सोमवारी सकाळी गणरायाचे संगमनेर तालुक्यात आगमन झाले. मार्गातील विविध ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषात श्रींचे जल्लोषात स्वागत केले. संपूर्ण शहर गणेशमय आणि भक्तिरसाने भारावून गेले.

बसस्थानक परिसरात आयोजित स्वागत सोहळ्यात आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते श्री गणरायाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती संपन्न झाली. यावेळी विघ्नहर्ता गणेश तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष साहिल कर्पे, उपाध्यक्ष अक्षय दुर्गुडे, श्लोक बिल्लाडे, समर्थ कटारे, विशाल जोशी, नमन कानकाटे, ओम दिनकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त उपस्थित होते.
“लहानपणापासून मुंबईतील भव्य गणेशमूर्ती पाहताना एक दिवस अशीच उंच व आकर्षक गणेशमूर्ती आपल्या संगमनेरात आणण्याचा संकल्प केला होता. मंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या अथक परिश्रम आणि सहकार्यामुळे यंदा तो संकल्प पूर्ण झाला. १४ फुटी भव्य गणरायाचे संगमनेरात आगमन हा आमच्या मंडळासाठी आणि संपूर्ण संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानाचा व अविस्मरणीय क्षण आहे,” असे विघ्नहर्ता गणेश तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष साहिल कर्पे यांनी सांगितले.
