संगमनेर पोलिसांकडून मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप ; महिलेचा आत्मदहनचा इशारा

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

संगमनेर प्रतिनिधी –

घुलेवाडी येथील रहिवासी असलेल्या महिलेने आपल्याला व आपल्या पतीला मारहाण करून अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप करत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विजय ताताजी आगलावे व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यावर कारवाई करून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली असून कारवाई झाली नाही तर संबंधित कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या अर्जानुसार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्या आपल्या पती व ३.५ वर्षांच्या लहान मुलासह नवीन नगररोड, संगमनेर येथील खाजगी दवाखान्यात एक्स-रे काढण्यासाठी गेल्या होत्या. दिल्ली नाका परिसरातून असताना उपमुख्यमंत्री यांचा ताफा येणार असल्याने दोन्ही बाजूंना मोठी गर्दी झाली होती.

गर्दीतून वाट काढून जात असताना विजय ताताजी आगलावे हे पोलीस कर्मचारी कोणत्याही प्रकारचा युनिफॉर्म नसताना बंदोबस्तावर असल्याचे अर्जात नमूद केले आहे. त्यांनी रस्त्यात अडवून गाडीची चावी काढून घेतली व त्यांच्या पतीची गचंडी पकडून अश्लील शिवीगाळ करत कानामागे मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच, आपल्यालाही अश्लील हावभाव करून शिवीगाळ केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आगलावे यांनी अकोले येथेही महिलेसोबत अशाच प्रकारचे वर्तन केल्याचा गुन्हा दाखल असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

त्यानंतर आपल्याला दिल्ली नाक्यावरच सोडून पतीला संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आपण आपल्या लहान मुलाला घेऊन दिल्ली नाक्यापासून पोलीस ठाण्यापर्यंत पायी चालत गेले असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर श्रीकांत सावंत, पोलीस उपनिरीक्षक यांनी आपल्याला बाहेर निघण्यास सांगून, “तुझ्या नवऱ्याचे हाल करतो, तुमची लायकी नाही” अशा शब्दांत शिवीगाळ केल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे. तसेच, पतीच्या नोकरीच्या ठिकाणच्या मॅनेजरचा नंबर घेऊन त्याला फोन करून “तुम्ही अशा गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी कामावर ठेवले का ?” असे म्हणत दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

पोलीसांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही केला असून, या गुन्ह्यांची चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. तसेच, आपल्या पतीला मारहाण झाल्यानंतर त्याची फिर्याद घेण्यास सावंत यांनी नकार दिल्याचा आरोप करत, “तुम्हाला कुणाकडे जायचे त्याच्याकडे जा, आम्हाला काही फरक पडत नाही,” असे सांगितल्याचे अर्जात म्हटले आहे.

दरम्यान, विजय ताताजी आगलावे व श्रीकांत सावंत यांच्यावर महिलेला शिवीगाळ केल्याचे गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी सदर महिलेने केली आहे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी अर्जातून दिला असून, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे त्यांनी नमूद केले आहे. या तक्रारीसोबत मुलाच्या दवाखान्याची कागदपत्रे जोडण्यात आली आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!