“चरणसेवेतून वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांना दिलासा !
श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवा
अहिल्यानगर | प्रतिनिधी
आषाढी वारीतील वारकऱ्यांचा पायी प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि आरोग्यदायी व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘चरणसेवा’ उपक्रमांतर्गत प्रवरा मेडिकल कॉलेज, लोणी यांच्या वतीने राजुरी (ता. राहाता) येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त चरणसेवा व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दि. ७ जुलै रोजी पालखीचे राजुरी येथे आगमन झाल्यानंतर शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांना आयुर्वेदिक औषधी तेलाने पायांची चरणसेवा करण्यात आली. या सेवेमुळे दीर्घ पायी प्रवासामुळे आलेला ताण व थकवा कमी होऊन वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी नवउत्साह मिळाला.

याचबरोबर वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. प्रथमोपचार सेवा, विविध आजारांबाबत आरोग्य मार्गदर्शन तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहितीही देण्यात आली.
या सेवाभावी उपक्रमात प्रवरा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वारकऱ्यांना तत्पर व आपुलकीची सेवा दिली.

चरणसेवा उपक्रमामुळे पुढील प्रवासासाठी मोठा आधार मिळाल्याची भावना व्यक्त करत वारकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष तसेच प्रवरा मेडिकल कॉलेजच्या सर्व डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांचे आभार मानले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवरा मेडिकल कॉलेजच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
